‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे कर्नाटक, गोवा, कोकणात तुफानी पाऊस – शेकडो घरांचे नुकसान

- असंख्य झाडे, वीजेचे खांब उन्मळून पडले

१८ तारखेला गुजरात किनारपट्टीवर वादळ धडकणार असल्याने या राज्यातील किनारपट्टींच्या भागातून सुमारे दीड लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

मुंबई/मंगळुरू/पणजी – ‘तोक्ते’ चक्रीवादळाने कर्नाटकनंतर गोव्यात मोठ्या प्रमाणावर उत्पात माजविला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वार्‍याने किनारपट्टीकडील गावांना मोठा तडाखा दिला असून ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे आणि विजेचे खांब कोसळल्याचे चित्र पहायला मिळाले. कर्नाटकात सुमारे ७३ गावांमध्ये खूप जास्त नुकसान झाले आहे, तसेच चार जणांचा बळी गेल्याचेही वृत्त आहे. गोव्यातही दोन जणांचा बळी गेला आहे. तसेच शंभरहून अधिक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी कोकणात सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. तर संध्याकाळनंतर रायगड आणि मुंबई किनारपट्टीवरही जोरदार वारे वाहू लागले.

‘तौक्ते’अरबी समुद्रात पाच दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर तीन दिवसांपूर्वी ‘तोक्ते’ चक्रीवादळात झाले होते. केरळमध्ये दोन दिवस यामुळे जोरदार पाऊस झाला. यामुळे काही भागात पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. तर गेल्या ४८ तासात ‘तोक्ते’च्या प्रभावामुळे कर्नाटक व त्यानंतर गोव्याला जोरदार वारे व मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे. कर्नाटकात ७ जिल्ह्यातील १७ तालुक्यांमध्ये किनारपट्टीकडील भागात या वादळाचा प्रभाव जास्त दिसून आला. काही गावांमध्ये मोठे नुकसान झाले असून शेकडो झाडे व विजेचे खांब पडले. यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. कित्येक भागात पाणी साठल्याचे चित्र दिसले. समुद्रात उठणार्‍या जोरदार लाटा किनारपट्टीवर धडकत होत्या. यामुळे समुद्र किनारी शाकारलेल्या कितीतरी मच्छिमार बोटींचेही नुकसान झाले आहे.

गोव्यातही ५०० हून अधिक झाडे गेल्या दोन दिवसात उन्मळूत पडली आहेत. तसेच १०० हून अधिक घरांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती गोवा सरकारने दिली आहे. रविवारी पहाटे वादळ गोवा किनारपट्टीपासून काही अंतरावरुन गुजरातच्या दिशेने पुढे सरकले. त्यामुळे गोवा आणि सिंधुदूर्गात सुमारे ७० ते ८० किलोमीटर इतक्या वेगाने वारे वाहत होते. तसेच पावसाचा जोरही वाढला. गोव्या किनारपट्टीपासून पुढे सरकल्यावर कोकणात पावसाचा जोर वाढला. रत्नागिरी जिल्ह्यात यानंतर तुफानी पावसाला सुरूवात झाली. तसेच रायगड, मुंबई, ठाणे या कोकणातील इतर जिल्ह्यातही वार्‍याचा वेग वाढला. रायगडमध्ये रविवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. याशिवाय महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही या वादळाच्या प्रभावामुळे वार्‍यासह पाऊस झाला.

हे वादळ गुजरातच्या दिशेने जसजसे पुढे सरकत आहे, तसा वार्‍याचा वेग आणखी वाढत आहे. पुढील चोवीस तासात वार्‍याचा वेग १२० किलोमीटर प्रती तासावर जाण्याचा अंदाज आहे. तसेच १८ तारखेला गुजरातच्या द्वारका, जामनगर, भावनगरमध्ये या वादळाचा तडाखा बसेल त्यावेळी वार्‍याचा वेग १६५ किलोमीटर प्रती तास असण्याची शक्यता वर्तविण्यात येते. तसेच दादरा व नगर हवेली, दमन, याशिवाय गुजरातच्या भरुच, सुरत आणि अहमदाबादच्या काही भागात जोरदार पाऊस होईल, असा इशारा हवामानखात्याने दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर सुमारे दीड लाख नागरिकांना किनारपट्टीच्या भागाकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

leave a reply