‘आयएसआय’च्या इशाऱ्यावर रचलेला दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला

- हैदराबादमधून तीन दहशतवाद्यांना स्फोटकांसह अटक

मोठा कटहैदराबाद – सणासुदीचा काळ सुरू असताना गर्दीच्या ठिकाणी हल्ले करून दहशत माजविण्याचा मोठा कट उघडकीस आला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’च्या इशाऱ्यावर हे आत्मघाती हल्ले करण्यात येणार होते. पकडण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये अब्दुल जाहेद या दहशतवाद्याचा समावेश असून 2002 ते 2005 दरम्यान झालेल्या तीन दहशतवादी हल्ल्यांमध्येही जाहेदचा हात होता, असे चौकशीत उघड झाले आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणांना मिळालेले हे मोठे यश मानण्यात येते. तसेच जाहेद व त्याचे साथीदार सीमेपलीकडे फरहतुल्ला गौरी या ‘आयएसआय’ हस्तकाच्या संपर्कात होते. गौरीला आधीच भारत सरकारने युएपीए कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित केले आहे.

हैदराबाद पोलिसांनी रविवारी एक ऑपरेशन हाती घेत मलाकपेट भागात कारवाई करीत तिघा जणांना अटक केली. अब्दुल झैद, मोहद समिउद्दीन आणि हसन फारुखी अशी या तिघांची नावे आहे. यातील अब्दुल झैद, मोहद समिउद्दीन सईदाबाद भागातील राहणारा असून माज हसन फारुखी याला हुमायू नगरमधील आहे. ही सर्व कारवाई गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे करण्यात आली. या तिघांच्या चौकशीत मोठ्या कटाचा खुलासा झाला आहे. तसेच काही वर्षांपूर्वी शहरात झालेल्या हल्ल्यांमधील एक आरोपीही पोलिसांच्या हाती लागला आहे.

अब्दुल झैद असे या दहशतवाद्याचे नाव आहे. झैदच्या चौकशीतच हा कट व त्याने आधी केलेल्या दहशतवादी कारवाया उघड झाल्या. शहरात सणउत्सव सुरू असताना हल्ले घडविण्यासाठी झैदपर्यंत चार हॅण्डग्रेनेडचे पार्सल पोहोचविण्यात आले होते. या हॅण्डग्रेनेडचा वापर स्फोट घडविण्याचे, तसेच प्रसंग ‘लोन उल्फ’ हल्ला करण्याचा कट आखण्यात आला होता. यासाठी फरहतुल्ला गौरी उर्फ एफजी, सिद्दीकी बिन उस्मान उर्फ रफीक आणि अब्दुल माजिद उर्फ छोटू या तिघांकडून सूचना मिळत होत्या. पाकिस्तानी हस्तक व लश्कर-ए-तोयबाचे दहशतवादी असलेल्या या तिघांच्या संपर्कात झैद सतत होता, अशी माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली आहे.

2004 साली हैदराबादमधील दिलसूखनगर येथील साईबाबा मंदिराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात, 2004 साली सिकंदराबादमधील गणेश मंदिरानजीक झालेल्या स्फोटात आणि 2005 सालात बेगपत भागात टास्क फोर्सच्या ऑफीसमध्ये झालेल्या स्फोटात अब्दुल झैदचा समावेश होता. त्यानेच हे बॉम्ब फरहतुल्लाच्या इशाऱ्यावर प्लांट केले होते, असे समोर आले आहे. याशिवाय 2005 च्या मुंबईतील घाटकोपरमध्ये बेस्ट बसमध्ये झालेल्या स्फोटातही त्याचा हात होता, असे दावे काही वृत्तांमधून होत आहेत. अब्दुल झैद हा तरुणांना भडकून दहशतवादी कारवायांसाठी त्यांना तयार करीत होता. त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती करीत होता, अशीही माहिती पोलीस चौकशीत उघडकीस आली आहे. यामुळे अब्दुल झैद आणि त्याच्या साथीदारांना झालेली अटक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. या तिघांच्या अटकेमुळे देशातील या दहशतवाद्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात यश मिळू शकते.

leave a reply