कोरोनाच्या नव्या प्रकारांच्या पार्श्‍वभूमीवर युरोपात सामूहिक लसीकरणाला सुरुवात

ब्रुसेल्स – जगाच्या विविध भागांमध्ये कोरोनाव्हायरसचे नवे प्रकार (स्ट्रेन) समोर येत असतानाच युरोपिय महासंघाने सामूहिक लसीकरणाच्या विशेष मोहिमेला सुरुवात केली आहे. रविवारपासून महासंघाच्या २७ सदस्य देशांमध्ये लसीकरण मोहीम चालू झाली असून पुढील दोन दिवस ही मोहीम राबविण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसात युरोपिय देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण तसेच बळींची संख्या वेगाने वाढत असून ‘लॉकडाऊन’सह इतर उपाययोजना अपयशी ठरताना दिसत आहेत.

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या आठ कोटींवर गेली असून १७ लाखांहून अधिक जण दगावले आहेत. कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी २० टक्क्यांहून अधिक रुग्ण युरोप खंडात आढळले आहेत. युरोपिय देशांमध्ये कोरोनाच्या साथीतील बळींची संख्या तीन लाख ३६ हजारांवर गेली असून जागतिक आकडेवारीच्या तुलनेत ही संख्या १८ ते २० टक्क्यांमध्ये आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून युरोपिय देशांमधील वाढत्या फैलावाबाबत सातत्याने चिंता व्यक्त करण्यात येत असून साथीची तिसरी लाट येऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

या पार्श्‍वभूमीवर रविवारपासून सुरू झालेली लसीकरण मोहीम लक्ष वेधून घेणारी ठरते. युरोपिय महासंघाने ‘फायझर-बायोन्टेक’च्या लसीला मान्यता दिली असून सर्व सदस्य देशांमध्ये लस पोहोचेल, याची खबरदारी घेतल्याचे सांगण्यात येते. युरोपातील ४५ कोटी जनतेला लस देण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात आल्याची माहिती महासंघाच्या प्रमुख उर्सुला व्हॉन डेर लेयन यांनी दिली आहे. रविवारपासून सुरू झालेली विशेष मोहिम तीन दिवसांसाठी असून प्रत्येक देशात किमान १० हजार लसी पुरविण्यात आल्याचे सांगण्यात येते.

अमेरिका तसेच ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या लसीकरणात ‘फायझर’ची लस वापरण्यात आली असून त्याचे काही दुष्परिणामही समोर येऊ लागले आहेत. लस दिल्यानंतर विशिष्ट अ‍ॅलर्जी होत असल्याच्या घटना उघड झाल्या असून त्यासाठी लसीत वापरण्यात आलेला ‘पीईजी’ हा घटक कारणीभूत असावा, असा दावा काही संशोधकांनी केला आहे. ‘फायझर’पाठोपाठ ‘मॉडर्ना’ कंपनीची लस वापरल्यानंतरही अ‍ॅलर्जी झाल्याची घटना समोर आली आहे. ब्रिटन, अमेरिका व युरोपिय देशांसह सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात(युएई) या देशांमध्ये सध्या ‘फायझर’ची लस वापरण्यात येत आहे.

leave a reply