लिबियन बंडखोरांकडून तुर्कीला युद्धाची धमकी

त्रिपोली – लिबियामध्ये सैन्य तैनातीची मुदत वाढविणार्‍या तुर्कीला लिबियन बंडखोर नेता खलिफा हफ्तार यांनी धमकावले आहे. ‘तुर्कीच्या वसाहतवादाचा काळ संपुष्टात आला आहे. तेव्हा तुर्कीने लिबियातून चालते व्हावे किंवा युद्धासाठी तयार रहावे’, अशी धमकी हफ्तार यांनी दिली. तर लिबियातील तुर्कीच्या जवानांना लक्ष्य केले तर हफ्तार बंडखोर व त्यांच्या समर्थकांना लक्ष्य केले जाईल, असा इशारा तुर्कीचे संरक्षणमंत्री हुलूसी अकार यांनी दिला. तुर्कीच्या संरक्षणमंत्र्यांचा हा इशारा हफ्तार बंडखोरांबरोबर रशिया, फ्रान्स, युएई आणि इजिप्तसाठी असल्याचा दावा केला जातो.

लिबियन बंडखोर

तुर्कीचे संरक्षणमंत्री हुलूसी अकार यांनी दोन दिवसांपूर्वी लिबियाचा दौरा केला. लिबियातील फयज सराज सरकारबरोबर संरक्षण सहकार्य करार करण्यासाठी अकार यांचा हा दौरा असल्याची घोषणा तुर्कीने केली होती. अकार यांच्या या दौर्‍याआधी तुर्कीच्या संसदेने लिबियन सरकारसाठी शस्त्रास्त्र विक्री करण्याबरोबर या उत्तर आफ्रिकी देशातील तुर्कीच्या लष्कर तैनातीची मुदत १८ महिन्यांनी वाढविण्याचा प्रस्तावही मंजूर केला होता. या निर्णयामुळे लिबियातील तुर्कीच्या जवानांबरोबर कंत्राटी जवानांची तैनाती देखील दीड वर्षांसाठी वाढली होती.

ऑक्टोबर महिन्यात लिबियातील सरकार आणि बंडखोरांमध्ये झालेल्या संघर्षबंदी करारानुसार, तीन महिन्यांच्या कालावधीत लिबियामध्ये तैनात परदेशी तसेच कंत्राटी जवानांना माघारी घेणे आवश्यक होते. यामध्ये तुर्की, रशियाच्या कंत्राटी जवानांचा समावेश होता. त्यामुळे तुर्कीने लिबियातील आपली सैन्यतैनाती तसेच कंत्राटी जवान व सिरियातील कट्टरपंथियांची तैनाती १८ महिन्यांसाठी कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे खवळलेल्या लिबियन बंडखोरांनी तुर्कीवर संघर्षबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

लिबियन बंडखोर

तुर्कीच्या या निर्णयावर संताप व्यक्त करून लिबियातील बंडखोर संघटनेचा प्रमुख जनरल खलिफा हफ्तार यांनी तुर्कीला लिबिया सोडून जाण्याचा इशारा दिला. ‘तुर्कीचे जवान लिबियात तैनात असेपर्यंत या देशात शांती व सुरक्षा प्रस्थापित होऊ शकत नाही. तुर्कीच्या जवानांची लिबियातील तैनाती ही आमच्या देशाचा अपमान ठरते’, अशी टीका हफ्तार यांनी केली. तुर्कीचे सरकार संघर्षबंदीच्या नियमांचे पालन करणार नसतील तर लिबियातील शांतीसाठी आम्ही पुन्हा शस्त्र हाती घेण्यास तयार असल्याचा इशारा हफ्तार यांनी दिला.

राष्ट्राध्यक्ष एर्दोगन हे लिबियाला तुर्कीची वसाहत बनविण्याची इच्छा बाळगून असल्याचा आरोप हफ्तार यांनी केला. मात्र, ‘वसाहतवादी तुर्कीकडे दोन पर्याय उपलब्ध असून त्यांनी एक तर शांतपणे लिबियातून माघार घ्यावी किंवा बलप्रयोगाद्वारे होणार्‍या हकालपट्टीसाठी तयार रहावे’, असे हफ्तार यांनी बजावले. त्याचबरोबर तुर्की आणि तुर्कीचे कंत्राटी जवान लिबियात युद्धाची तयारी करीत असल्याचा आरोप बंडखोर नेत्यांनी केला. तुर्कीने पहिली गोळी झाडली तर त्यांनी मरणासाठी देखील तयार रहावे, असा इशारा हफ्तार यांनी दिला.

लिबियन बंडखोरांच्या प्रमुखाने इशारा दिला त्यावेळी तुर्कीचे संरक्षणमंत्री अकार लिबियामध्येच होते. संरक्षणमंत्री अकार यांनी लिबियातील तुर्कीच्या सैन्यतैनातीचे समर्थन केले. त्याचबरोबर तुर्कीच्या जवानांना किंवा हितसंबंधांना नुकसान पोहोचले तर हफ्तार बंडखोर आणि त्यांच्या समर्थकांना लक्ष्य केले जाईल, अशी घोषणा अकार यांनी केली.

२०११ साली लिबियात पेटलेल्या गृहयुद्धात कट्टरपंथियांनी हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांची सत्ता उलथून त्यांना ठार केले. त्यानंतर याच कट्टरपंथी गटांमध्ये लिबियाच्या सत्तेसाठी संघर्ष पेटला होता. पाच वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाने सराज यांच्या कट्टरपंथी आघाडी सरकारला मान्यता दिली. पण या निर्णयामुळे लिबियातील लष्करात दोन मोठे गट पडले. जनरल हफ्तार यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या बंडखोरांनी सराज सरकारविरोधात बंड पुकारले आणि तेव्हापासून लिबियामध्ये हा संघर्ष सुरू होता. महिन्याभराच्या संघर्षबंदीनंतर लिबिया पुन्हा एकदा गृहयुद्धात ढकलला जाण्याची शक्यता बळावली आहे.

leave a reply