पश्‍चिम आफ्रिकेतील गिनीमध्ये झालेल्या लष्करी बंडानंतर राष्ट्राध्यक्ष कॉंडेंना अटक

कॉनाक्रि – पश्‍चिम आफ्रिकेतील खनिजसंपन्न गिनी या देशात झालेल्या लष्करी बंडानंतर राष्ट्राध्यक्ष अल्फा कॉंडे यांना अटक करून बंदी बनविण्यात आले आहे. लष्कराने सरकार व राज्यघटना बरखास्त केली असून येत्या काही आठवड्यात नव्या राष्ट्रीय सरकारची स्थापना करण्यात येईल, असे जाहीर केले आहे. गिनीतील बंडानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ऍल्युमिनिअमचे भाव कडाडल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या सहा महिन्यात आफ्रिका खंडात लष्कराने बंड करण्याची ही तिसरी घटना ठरली आहे. यापूर्वी चाड तसेच मालीतही लष्कराने बंड करून सत्ता ताब्यात घेतली आहे.

रविवारी सकाळी गिनीच्या लष्कराने बंड करून सत्ता ताब्यात घेतली. या बंडाचे नेतृत्त्व ‘स्पेशल फोर्सेस युनिट’चे प्रमुख कर्नल ममादी बोम्बोया हे लष्करी अधिकारी करीत असल्याचे समोर आले आहे. सरकारमधील भ्रष्टाचार व गैरव्यवस्थापन यांच्याविरोधात हे बंड असल्याची माहिती कर्नल बोम्बोया यांनी दिली. बंडानंतर राष्ट्राध्यक्ष कॉंडे यांना अटक करून अज्ञात स्थळी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. सरकार व राज्यघटना भंग करण्यात आली असून स्थानिक प्रांतांची जबाबदारी लष्करी अधिकार्‍यांकडे देण्यात आली आहे.

बंडानंतर देशाच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या असून सरकारी अधिकारी व नेत्यांच्या परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. देशातील खनिज कंपन्यांना त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशातील इतर गटांशी चर्चा सुरू करण्यात आली असून येत्या काही आठवड्यात राष्ट्रीय सरकार स्थापन करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली असून माजी अधिकारी व नेत्यांविरोधात सूडबुद्धिने कारवाई केली जाणार नाही, असे आश्‍वासन लष्करी अधिकार्‍यांच्या गटाने दिले आहे.

राष्ट्राध्यक्ष अल्फा कॉंडे यांनी गेल्या वर्षी सलग तिसर्‍यांदा सत्ता मिळविण्यात यश मिळविले होते. मात्र त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तसेच मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचे आरोप होत आहेत. त्यांच्याविरोधात देशात निदर्शनेही झाली होती. देशातील जनतेत कॉंडे यांच्या कारभाराविरोधात नाराजी असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे रविवारी झालेल्या बंडानंतर राजधानी कॉनाक्रिसह काही शहरांमध्ये लष्कराच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर उतरल्याचे चित्रही पहायला मिळाले.

 

गिनीमध्ये झालेल्या लष्करी बंडावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आफ्रिकन महासंघ, ‘इकोवास’ हा आफ्रिकी देशांचा गट, संयुक्त राष्ट्रसंघटनेने बंडाची तीव्र शब्दात निंदा केली आहे. अमेरिका व रशियानेही लष्करी बंडावर नाराजी व्यक्त केली असून शांतता व स्थैर्य धोक्यात आल्याचे म्हंटले आहे. रशियाने राष्ट्राध्यक्ष कॉंडे यांना तातडीने पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी केली आहे. गिनीच्या संरक्षणदलात तसेच खनिज क्षेत्रात रशियाचे हितसंबंध गुंतल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या बंडाची रशियाने गंभीर दखल घेतल्याचे समोर येत आहे.

गिनी हा खनिजसंपन्न देश असून बॉक्साईटच्या उत्पादनात आघाडीवरील देश म्हणून ओळखण्यात येतो. गिनीतील लष्करी बंडानंतर बॉक्साईटच्या निर्यातीवर परिणाम होण्याचे संकेत विश्‍लेषकांकडून देण्यात आले आहेत. बॉक्साईट हे खनिज ऍल्युमिनिअमच्या निर्मितीतील प्रमुख घटक आहे. गिनीतील बंडामुळे ऍल्युमिनिअमचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भाव कडाडले असून दशकातील सर्वोच्च दर नोंदविण्यात आल्याचे वृत्त देण्यात आले आहे. गिनीतून बॉक्साईट आयात करणार्‍या देशांमध्ये चीन हा आघाडीचा देश असून, बंडाचा फटका चीनमधील उत्पादकांना बसू शकतो, असे सांगण्यात येते.

leave a reply