उत्तर कोरियातील आण्विक किरणोत्सर्गामुळे चीन, जपानमधील लाखो जणांना धोका

- दक्षिण कोरियातील मानवाधिकार संघटनेचा इशारा

सेऊल – उत्तर कोरियाने केलेल्या अणुचाचण्या आणि सुरू असलेल्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांमुळे आण्विक किरणोत्सर्गाचा धोका भयावहरित्या वाढला आहे. दहा लाखांहून अधिक उत्तर कोरियन जनतेबरोबरच दक्षिण कोरिया, चीन व जपानमधील नागरिकांनाही या किरणोत्सर्गाचा धोका संभवतो, असा इशारा दक्षिण कोरियातील मानवाधिकार संघटनेने दिला. हे आण्विक संकट टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने उत्तर कोरियातील अणुचाचणीच्या ठिकाणांजवळचे निरिक्षण करावे, असे या मानवाधिकार संघटनेने सुचविले आहे. उत्तर कोरिया सातव्या अणुचाचणीच्या तयारीत असताना या संघटनेने दिलेला इशारा अतिशय गंभीर ठरतो.

२००६ ते २०१७ या कालावधीत उत्तर कोरियाने एकूण सहा अणुचाचण्या घेतल्या आहेत. हांग्योंग प्रांतातील प्युंगे-री या तळावर या चाचण्या पार पडल्या होत्या. उत्तर कोरिया आपली सातवी अणुचाचणी देखील याच तळावर करणार असल्याचा दावा केला जातो. त्यासाठी उत्तर कोरियाने आपल्या लष्करी हालचाली वाढविल्या आहेत. गेल्या वर्षी उत्तर कोरियाने आपल्या आण्विक धोरणात केलेल्या बदलानंतर सातवी अणुचाचणी सर्वात मोठ्या क्षमतेची असेल, असा दावा केला जातो.

पण उत्तर कोरियाच्या या अणुचाचण्यांमुळे नवे संकट उभे राहिल्याचा इशारा ‘ट्रान्झिश्नल जस्टिस वकिग ग्रूप’ या दक्षिण कोरियास्थित मानवाधिकार संघटनेने केला. याआधी उत्तर कोरियाने प्युंगे-री तळात घेतलेल्या अणुचाचणीमुळे या क्षेत्रातील भूजल साठ्यांमध्ये किरणोत्सार झाल्याचा दावा या मानवाधिकार संघटनेने केला. किमान जवळपास आठ शहरे आणि कौंटीज्‌‍ या किरणोत्सारी जलामुळे बाधित झाली आहे. किमान दहा लाखांहून अधिक लोकसंख्या या भागात वस्ती करून असल्याचे सदर मानवाधिकार संघटनेने लक्षात आणून दिले.

याच पाण्याचा वापर शेतीसाठी केला जातो. त्यामुळे या भागात पिकणारी फळे, भाज्यांची शेजारी देशांमध्ये होणारी विक्री पाहता, उत्तर कोरियातील या किरणोत्सारी जलाचा प्रादुर्भाव दक्षिण कोरियासह चीन व जपानमधील लाखो जनतेलाही धोक्यात टाकत असल्याचे या संघटनेने बजावले. यासाठी सदर संघटनेने २०१५ सालच्या घटनेचा दाखला दिला. सात वर्षांपूर्वी दक्षिण कोरियाच्या अन्नसुरक्षा संस्थेने उत्तर कोरियातून आयात केलेल्या मशरूममध्ये प्रमाणापेक्षा नऊ पट अधिक किरणोत्सर्ग झाल्याचे आढळले होते. चिनी माल म्हणून सदर भाजी दक्षिण कोरिया तसेच जपानमध्ये विक्रीला रवाना केली जाते, असा दावा मानवाधिकार संघटनेने केला.

उत्तर कोरियाच्या अणुचाचणीच्या ठिकाणी मोठा किरणोत्सर्ग झाल्याची दाट शक्यताही या संघटनेने व्यक्त केली. २०१८ साली उत्तर कोरियाने अणुचाचणीच्या ठिकाणाजवळील काही बांधकाम पाडले होते. यासाठी उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय माध्यमांना बोलाविले होते. पण सदर ठिकाणी पोहोचल्यानंतर उत्तर कोरियन जवानांनी काही पत्रकारांकडील किरणोत्सर्ग मोजणारे डिटेक्टर्स अर्थात यंत्र काढून घेतले होते, याची आठवण या संघटनेने करुन दिली. त्यामुळे उत्तर कोरिया किरणोत्सर्ग लपविण्याचा प्रयत्न करीत असून यामुळे लाखो जणांचा जीव धोक्यात सापडल्याचा इशारा सदर मानवाधिकार संघटनेने केला.

उत्तर कोरियाने सुरू केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्या या संकटात वाढ करीत असल्याचा दावा दक्षिण कोरियन संघटनेने केला. काही तासांपूर्वीच उत्तर कोरियाने दोन आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. यातील एक क्षेपणास्त्र जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राजवळ कोसळले होते.

leave a reply