अमेरिका युक्रेनला रशियाबरोबर संघर्षबंदी करार करणे भाग पाडेल

- अमेरिकेच्या न्यूज वेबसाईटचा दावा

किव्ह/वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या युक्रेन भेटीमुळे रशियन राजवटीला खरमरीत संदेश गेल्याचे दावे पाश्चिमात्य आघाडीकडून करण्यात येत आहेत. मात्र प्रत्यक्षात अमेरिका तसेच युक्रेनमधील वर्तुळातील परिस्थिती वेगळी असल्याचा दावा अमेरिकेतील आघाडीच्या वेबसाईटने केला. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये अमेरिका युक्रेनला रशियाबरोबर करार करणे भाग पाडेल, अशी भीती युक्रेनियन वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

‘अमेरिकेची संसद व बायडेन प्रशासन अशा दोन्ही ठिकाणी असलेल्या काही व्यक्ती युक्रेनला देण्यात येणारे शस्त्रसहाय्य मर्यादित करण्याच्या प्रयत्नात आहेत. युक्रेनने रशियाबरोबरील करारासाठी तयार व्हावे यासाठी अशा प्रकारची पावले उचलली जात असावीत, अशी भीती मला वाटते’, असे वक्तव्य युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या सल्लागारांनी केले आहे. अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी युक्रेनला दिलेल्या भेटींमध्येही अशाच प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. बर्न्स यांनी अमेरिकेकडून करण्यात येणारे शस्त्रसहाय्य कमी होऊ शकते, असे सांगितल्याचा दावा युक्रेनच्या दोन अधिकाऱ्यांनी केला आहे.

अमेरिकेतील आघाडीची वेबसाईट ‘पॉलिटिको’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. उन्हाळ्यापर्यंत युक्रेनने रशियाविरोधात मोठे यश मिळवून दाखवणे भाग असल्याचे अमेरिकी प्रशासनाकडून वारंवार सांगण्ण्यात येत आहे. अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहावर रिपब्लिकन पार्टीने बहुमत मिळविले आहे. या पक्षातील अनेक संसद सदस्यांनी युक्रेनला अमर्याद आर्थिक सहाय्य तसेच शस्त्रपुरवठा करण्याच्या मुद्यावर नाराजी व्यक्त केली आहे. काही सदस्यांनी त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विधेयक आणण्याचेही संकेत दिले आहेत. बायडेन प्रशासन या मुद्याचा वापर करून युक्रेनचे शस्त्रसहाय्य कमी करण्याचे संकेत देईल, असेही अमेरिकी वेबसाईटच्या वृत्तात नमूद करण्यात आले.

दरम्यान, अमेरिकेतील ‘ब्लूमबर्ग’ या वेबसाईटने बायडेन प्रशासन युक्रेनला नवे ‘ग्लायडिंग बॉम्ब्स्‌‍’ पुरविण्याच्या हालचाली करीत असल्याचा दावा केला. या बॉम्ब्सचा पल्ला ८० किलोमीटर्सचा आहे, असे ‘ब्लूमबर्ग’ने आपल्या दाव्यात म्हटले आहे.

leave a reply