भारत शेजारी देशांच्या सुरक्षेकडेही गांभीर्याने पाहत आहे

- संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत

नवी दिल्ली – चीनबरोबरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावाकडे सार्‍या जगाचे लक्ष खिळलेले असताना, भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी अत्यंत सूचक विधान केले आहे. भारताची सुरक्षा केवळ आंतरराष्ट्रीय सीमा, नियंत्रण रेषा किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपूरती मर्यादित नाही. वेगाने सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेता, आपल्या शेजारी देशांमधील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षाही भारताला करावी लागेल’, असे जनरल बिपीन रावत यांनी म्हटले आहे. भारताच्या शेजारी देशांमध्ये आपला प्रभाव वाढवून कुरघोडी करू पाहणार्‍या चीनच्या आक्रमक धोरणाला संरक्षणदलप्रमुखांनी लक्ष केल्याचे दिसत आहे.

बिपीन रावत

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या कुरापती सुरूच असून चीनच्या लढाऊ विमानांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्याचबरोबर हिंदी महासागर क्षेत्रातही चीनने आपल्या विनाशिकांची गस्त वाढविली आहे. चीनच्या या प्रत्येक हालचालींवर भारताच्या संरक्षणदलांची करडी नजर असून भारतही आपल्या सामरिक कक्षा विस्तारणार असल्याचे स्पष्ट संकेत संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांनी दिले आहेत. यासंबंधी ‘चीफ ऑफ स्टाफ कमिटी’, ‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी’ यांच्याबरोबर चर्चा सुरू असल्याचे संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांनी सांगितले. यावेळी जनरल रावत यांनी चीनबरोबरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसह पाकिस्तानशी भिडलेल्या नियंत्रण रेषेचाही उल्लेख केला. त्याचबरोबर विस्तारीत शेजारी देशांमधील सामरिक ठिकाणांचा उल्लेख करुन संरक्षणदलप्रमुखांनी इंडोनेशिया, सिंगापूर आणि आखातातील मित्रदेशांच्या सुरक्षेकडे भारत गांभीर्याने पाहत असल्याचा संदेश दिला आहे.

‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या हालचालींच्या विरोधात इंडोनेशिया आणि सिंगापूर या आपल्या दोन मित्रदेशांनी केलेल्या लष्करी सहकार्याच्या मागणीवर भारत अत्यंत गांभीर्याने विचार करीत आहे. काही दिवसांपूर्वी भारताने ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रात आपल्या युद्धनौका रवाना करुन चीनला धक्का दिला होता. सीमावादावरील चर्चेत चीनने भारतीय नौदलाच्या या तैनातीचा उल्लेख केल्याच्या बातम्य होत्या. आत्तापर्यंत चीन हिंदी महासागर क्षेत्रात आपल्या नौदलाचा वावर वाढवून भारतावरील दडपण वाढवित होता. मात्र भारतीय नौदलाची तैनाती चीनला असुरक्षित करणारी बाब ठरल्याचे दिसत आहे.

साऊथ चायना सी क्षेत्रात अमेरिकेच्या युद्धनौका तैनात असताना, भारतीय नौदलाची या क्षेत्रातील उपस्थिती चीनवर दडपण वाढवित आहे. त्याचवेळी या क्षेत्रातील इतर देशांना मात्र दिलासा देत आहे. या तैनातीद्वारे भारताने चीनला संघर्ष झाल्यास, भारत काय करू शकेल, याची जाणीव करुन दिली आहे. संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांनीही शेजारी देश व भौगोलिकदृष्ट्या जवळ असलेल्या देशांच्या सुरक्षेकडे भारत अत्यंत गांभीर्याने पाहत आहे, असा संदेश दिला आहे. दरम्यान, भारत अमेरिका आणि रशिया यांच्याबरोबरील सामरिक सहकार्याचा समतोल कायम राखणार असल्याची ग्वाही देखील संरक्षणदलप्रमुखांनी दिली आहे.

leave a reply