‘मंकीपॉक्स’ची साथ अनेक महिने कायम राहिल

- वैद्यकतज्ज्ञांचा दावा

‘मंकीपॉक्स'वॉशिंग्टन/जीनिव्हा – ‘मंकीपॉक्स व्हायरस’ची साथ पुढील अनेक महिन्यांसाठी कायम राहण्याची शक्यता असून ती थांबविण्याच्या संधी हातातून निसटत चालल्याचे वैद्यकतज्ज्ञांनी बजावले आहे. अमेरिका व युरोपमध्ये या साथीचा फैलाव अतिशय वेगाने होत असून एकट्या ब्रिटनमध्ये सव्वा लाखांपर्यंत रुग्ण आढळण्याची भीती व्यक्त करण्यात येते. गेल्याच आठवड्यात ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्सचा संसर्ग ही ‘ग्लोबल हेल्थ ईमर्जन्सी’ असल्याची घोषणा केली होती.

जगभरातील 70हून अधिक देशांमध्ये ‘मंकीपॉक्स व्हायरस’चा फैलाव झाला असून रुग्णसंख्या 16 हजारांवर पोहोचली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण युरोपात आहेत. सर्वाधिक संसर्ग आढळलेल्या 10 देशांमध्ये सात युरोपिय देश असून स्पेनमध्ये सर्वाधिक 3,596 रुग्ण मिळाले आहेत. त्यापाठोपाठ अमेरिकेत 3,487 रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य यंत्रणा ‘सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेन्शन’ने दिली. ही आकडेवारी कमी दिसत असली तरी मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत मोठी भर पडत असल्याकडे आरोग्यतज्ज्ञांनी लक्ष वेधले.

‘मंकीपॉक्स'गेल्या 15 दिवसात रुग्णसंख्येत दुपटीने भर पडल्याचे ‘डब्ल्यूएचओ‘च्या तज्ज्ञांनी सांगितले. ‘आफ्रिकेतील वाढती रुग्णसंख्या हा आपल्यासाठी अलार्म होता. पण आपण त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. आता जागे होऊन काहीतरी ठोस करण्याची वेळ आली आहे. कोणत्याही एका ठिकाणी संसर्ग आढळणे याचा अर्थ सर्व ठिकाणी फैलाव असू शकतो, असा होऊ शकतो’, या शब्दात अमेरिकेतील डॉ. ॲन रिमोईन यांनी मंकीपॉक्सच्या वाढत्या धोक्याबाबत इशारा दिला. त्याचवेळी ‘मंकीपॉक्स व्हायरस’चा संसर्ग रोखण्यासाठी असलेली संधी हातातून निसटत चालल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

‘मंकीपॉक्स व्हायरस’च्या फैलावाकडे अनेक देशांचे दुर्लक्ष झाले, असा दावा जीनिव्हातील वैद्यकतज्ज्ञ अँटोईन फ्लाहॉल्ट यांनी केला. ब्रिटनमधील तज्ज्ञ जिमी व्हिटवर्थ यांनी पुढील चार ते सहा महिने मंकीपॉक्सचे रुग्ण कमी होण्याची शक्यता नाही, असे बजावले. ब्रिटनमधील काही आरोग्यविषयक गटांनी देशातील रुग्णसंख्या सव्वा लाखांवर रुग्ण असल्याची भीती वर्तविली आहे. अमेरिकेतही रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अमेरिकेत सध्या दररोज 200 च्या वर रुग्ण आढळत आहेत. पुढील काही दिवसात अमेरिकेत जगातील सर्वाधिक रुग्णसंख्या असेल, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. चाचण्या तसेच लसींचा अभाव यामुळे हा अमेरिकेतील मंकीपॉक्सचा फैलाव वाढत असून लागण झालेल्या अनेकांची अद्याप चाचणी तसेच नोंदही झाली नसल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली. काही तज्ज्ञांनी अमेरिकेतील उद्रेक आधीच नियंत्रणाबाहेर गेल्याचे संकेत दिले आहेत.

मे महिन्यात आफ्रिका खंडातील नायजेरियामधून ब्रिटनमध्ये आलेल्या एका व्यक्तीला ‘मंकीपॉक्स व्हायरस’ची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीत जगभरातील 72 देशांमध्ये याचा फैलाव झाला आहे.

leave a reply