आंध्र प्रदेशात कोरोनाचा अधिक घातक स्ट्रेन आढळला

- संशोधकांचा दावा

नवी दिल्ली – आंध्र प्रदेशात पंधरा पट अधिक वेगाने संसर्ग पसरविणारा, तसेच सध्याच्या स्ट्रेनपेक्षा घातक असलेला नवा स्ट्रेन आढळला आहे. ‘सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी’च्या (सीसीएमबी) संशोधकांनी हा दावा केला असून त्याला वैज्ञानिक भाषेत ‘एन४४०के’ असे नाव देण्यात आले आहे. तसेच त्याला ‘एपी स्ट्रेन’ असेही म्हटले आहे.

देशात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या दोन कोटींच्या पुढे पोहोचली आहे. देेशात सध्या ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ३५ लाखांवर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणावर प्रचंड ताण आला आहे. देशातील १३ राज्यांमध्ये आता दरदिवशी आढळणार्‍या नव्या रुग्णांची संख्या स्थिरावल्याचे, तर काही ठिकाणी घट होत असल्याची दिलासादायक माहिती सोमवारी आरोग्य मंत्रालयाने दिली होती. महाराष्ट्रात १२ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह दर कमी झाला आहे. मंगळवारीही महाराष्ट्रात ५१ हजार ८०० नवे रुग्ण आढळले, तसेच ८९१ मृत्यूंची नोंद करण्यात आली. मंगळवारी महाराष्ट्रात आढळलेले रुग्ण गेल्या आठवड्यात आढळत असलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी आहेत.

पण एकाबाजूला काही राज्यांंमध्ये कोरोना संक्रमणाची साखळी तुटत असल्याचे प्राथमिक संकेत मिळत असताना काही राज्यांमध्ये ही रुग्णसंख्या वाढत आहे. यामध्ये आंध्र प्रदेशाचाही समावेश आहे. मंगळवारी आंध्रप्रदेशात १९ हजार नवे रुग्ण आढळले होते. याच आंध्र प्रदेशमधून इशारा देणारी बातमी समोर येत आहे. आंध्र प्रदेशात कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळला असल्याचा दावा ‘सीसीएमबी’च्या संशोधकांनी केला आहे. आंध्र प्रदेशच्या कुरनूलमध्ये हा नवा स्ट्रेन आढळला. ‘एन४४०के’ हा नवा स्ट्रेन ‘बी१.६१७’ आणि ‘बी१.६१८’ या व्हेरियंटपेक्षाही अधिक संक्रमण पसरवणारा व घातक असल्याचा दावा ‘सीसीएमबी’च्या हवाल्याचे एका वृत्त अहवालात करण्यात आला आहे.

संशोधकांच्या दाव्यानुसार लागण झाल्यावर केवळ ३ ते ४ दिवसांत रुग्णांना हायपोक्सियाचा त्रास सुरू होतो. रुग्णाला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याची स्थिती बिघडत जाते. अशावेळी रुग्णांना लगेचच ऑक्सिजन मिळण्याची आवश्यकता भासते, असे ‘सीसीएमबी’ संशोधकांचे म्हणणे आहे. तसेच हा नवा स्ट्रेन तरुण आणि लहान मुलांनामध्येही वेगाने पसरत असून या स्ट्रेन पसरू नये याची साखळी वेळीच तुटावी यासाठी तातडीने उपायांची आवश्यकता असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, या स्ट्रेनबद्दल अद्याप आरोग्य विभाग, आयसीएमआरने कोणतीही माहिती दिलेली नाही.

leave a reply