सुदानच्या दर्फूरमधील वांशिक संघर्षात 160 हून अधिक जणांचा बळी

वांशिक संघर्षातखार्तुम – सुदानच्या वेस्ट दर्फूर प्रांतात झालेल्या वांशिक संघर्षात 160 हून अधिक जणांचा बळी गेला असून शेकडो जण जखमी झाले आहेत. वेस्ट दर्फूरमधील क्रेनिक भागातील गावांमध्ये हिंसाचार भडकल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. नव्या हिंसाचारामुळे या भागातील हजारोजणांना विस्थापित व्हावे लागल्याचे समोर आले आहे. या हिंसाचारामागे ‘अरब जंजावीद’ बंडखोरांचा हात असल्याचा दावा करण्यात आला. गेल्या चार महिन्यात दर्फूरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वांशिक संघर्ष भडकण्याची ही दुसरी वेळ आहे.

गेल्या आठवड्यात क्रेनिकमध्ये घडलेल्या घटनेनंतर मोठा वांशिक संघर्ष भडकला. क्रेनिकमधील घटनेत अज्ञात हल्लेखोरांनी दोन जणांची हत्या घडविली होती. त्यानंतर बंडखोरांच्या गटांनी क्रेनिकमधील गावांमध्ये घुसून जाळपोळ व हत्याकांड सुरू केले. जवळपास 24 तासांहून अधिक काळ हिंसाचार सुरू होता. हिंसाचारात प्रामुख्याने आफ्रिकी वंशाच्या मसालित लोकांना लक्ष्य करण्यात आले. संघर्षात किमान 168 जणांचा बळी गेला आहे तर 100हून अधिक जण जखमी आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर असून बळींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

वांशिक संघर्षातगेल्या दोन वर्षात दर्फूरमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे दिसत आहे. वांशिक संघर्ष व हिंसाचाराच्या या नव्या घटना 2003 साली भडकलेल्या संघर्षाशी साधर्म्य दाखविणाऱ्या आहेत, असा दावा करण्यात येतो. पाणी, शेती व जमिनीच्या मुद्यावरून स्थानिक आफ्रिकी व अरबवंशियांमध्ये 2003 साली मोठा संघर्ष उडाला होता. त्यावेळी सुदानमध्ये हुकुमशहा ओमर बशिर यांची राजवट होती. बशिर यांनी अरब गटांना पाठिंबा देऊन आफ्रिकीवंशियांचा संहार सुरू केला होता. वांशिक संघर्षात2020 साली बशिर यांची राजवट उलथून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे.

दर्फूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी 2007 साली संयुक्त राष्ट्रसंघटनेने शांतीसेना तैनात केली होती. मात्र त्यानंतरही हिंसाचारात विशेष फरक पडलेला नाही, उलट शांतीसेनेवरच हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. जवळपास 15 वर्षे हा भीषण संघर्ष सुरू होता. यात तीन लाखांहून अधिक जणांचा बळी गेला असून 25 लाखांहून अधिक जण विस्थापित झाले आहेत. दर्फूर भागात तैनात केलेल्या शांतीसेनेची मुदत 2020 सालच्या अखेरीस संपली असून या भागात आता सुदानी लष्कर तैनात करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर दर्फूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात लष्कराला अपयश आल्याचे दिसत आहे.

नव्या घटनांमध्ये ‘अरब जंजावीद’ बंडखोर गटांचा हात असणे ही बाब सुदानमधील लष्करी राजवटीसाठी धोक्याचे संकेत ठरतात. अरब जंजावीद गटांना काही देशांचे समर्थन असल्याचे मानले जाते. त्यामुळे हे गट व त्यांच्याकडून घडविण्यात येणारा हिंसाचार सुदानमध्ये नव्या अस्थैर्याला कारणीभूत ठरु शकतो, अशी चिंता विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

leave a reply