अंतराळयानावरील हल्ला म्हणजे तिसऱ्या महायुद्धाचा भडका

- रशियन अंतराळसंस्थेच्या प्रमुखांचा इशारा

तिसऱ्या महायुद्धाचा भडकामॉस्को/वॉशिंग्टन – ‘अवकाशातील हल्ल्यात परदेशी अंतराळयान उडवून दिल्यास त्यातून तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडू शकतो. अंतराळयानावरील हल्ला ही चिथावणी ठरते व याबाबत कोणीही शंका बाळगण्याचे कारण नाही’, अशा शब्दात रशियाच्या अंतराळसंस्थेचे प्रमुख दिमित्रि रोगोझिन यांनी तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला. यावेळी रोगोझिन यांनी अमेरिकेचे ‘एक्स-37′ हे अंतराळयान अण्वस्त्रवाहू असल्याचा खळबळजनक दावाही केला.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सायबरयुद्ध अथवा अणुयुद्धाचा भडका उडण्याबाबत सातत्याने इशारे देण्यात येत आहेत. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला रशियाची सर्व प्रकारे कोंडी करण्याचे प्रयत्न पाश्चिमात्य देशांकडून सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियाची अंतराळ क्षेत्रातील क्षमता संपविण्याचेही प्रयत्न केले जातील, असेही बजावले होते. त्यामुळे रशिया व पाश्चिमात्य देशांमधील अंतराळ सहकार्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. या पार्श्वभूमीवर रशियन अंतराळसंस्थेच्या प्रमुखांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

तिसऱ्या महायुद्धाचा भडकाअंतराळक्षेत्रातील संघर्षावरून तिसऱ्या महायुद्धाचा इशारा देणाऱ्या रोगोझिन यांनी, अमेरिकेवर टीकास्त्र सोडले. अमेरिकेच्या ‘एक्स-37′ यानात टेहळणी करण्यासाठी प्रगत यंत्रणा किंवा सर्वसंहारक शस्त्रे असू शकतात. हे यान म्हणजे सर्वसंहारक शस्त्रांसाठी नव्या प्रकारचे वाहक(कॅरिअर) ठरते. अंतराळातून होणारे हल्ले अतिशय गंभीर स्वरुपाचा धोका ठरतो, अशा शब्दात रशियन अंतराळप्रमुखांनी अमेरिकेला लक्ष्य केले. अमेरिकेने या यानाच्या क्षमतांबद्दलची कोणतीही माहिती पुरवलेली नाही, याकडेही रोगोझिन यांनी लक्ष वेधले. अमेरिका ‘एक्स-37’चा वापर अंतराळातून क्षेपणास्त्रे डागण्यासाठी करु शकतो, असे रशियाला वाटत असल्याचेही त्यांनी पुढे म्हटले.

अमेरिकेने उपग्रहभेदी क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांवर बंदी टाकण्याबाबत केलेली घोषणा म्हणजे निव्वळ प्रचाराचा भाग असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘अमेरिकेने आता बंदी घातली याचा अर्थ त्यांच्या सर्व प्रकारच्या आवश्यक चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. आता हा देश शांतीदूत असल्याचा आव आणत आहे’, अशा शब्दात रोगोझिन यांनी अमेरिकेला सुनावले.

leave a reply