महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे दोन हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळले

- मुंबईत निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात

नवी दिल्ली/मुंबई,  (वृत्तसंस्था) –  देशात कोरोनाव्हायरसमुळे दगावलेल्यांची संख्या ३२००च्या पुढे गेली आहे, तर एकूण रुग्णांची संख्या एका लाख पाच हजारापर्यंत पोहोचली आहे. देशात या साथीचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण महाराष्ट्रात सार्वधिक असून मंगळवारी राज्यात सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले. यामुळे राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३७ हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबईत चोवीस तासात ४३ जणांचा या साथीमुळे बळी गेला, तर १४११ नव्या रुग्णांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर मुंबईत निमलष्करीदलाच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईसह इतर हॉटस्पॉट क्षेत्रात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या नियमात कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. तर रेड झोन वगळता इतर भागात बस सेवेला आणि दुकानांना परवानगी देण्यात आली आहे.

मंगळवारी महाराष्ट्रात २१०० नवे रुग्ण आढळले. याआधी सोमवारी २०३३ आणि रविवारी २३४७ नवे रुग्ण आढळले होते. तीन दिवसात राज्यात कोरोनाचे ६५०० हुन अधिक नवे रुग्ण आढळले असताना लॉकडाऊनच्या  चौथा टप्प्याच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने  जारी केल्या आहेत. राज्यात आता रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे तीन नव्हे तर दोनच झोन असतील. रेड झोन आणि नॉन रेड झोन अशी राज्याची विभागणी करून लॉकडाऊनची मार्गदर्शक तत्वे त्यानुसार जारी करण्यात आली आहेत. राज्यात सध्या १८ महापालिका क्षेत्रे रेड झोनमध्ये आहेत. मुंबई महानगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती ही शहरे रेड झोनमध्ये आहेत. येथे कोणत्याही प्रकारे बस, टॅक्सी,मेट्रो  सुरु होणार नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले. 
राज्यात मुंबईत रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याने येथील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांबरोबर पोलिसांनाही कोरोनाची लागण होत आहे. मुंबईत या साथीची लागण झालेल्या पोलिसांची संख्या ७०० वर पोहोचली आहे. मुंबईत दिवसाला ४० पोलिसांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. मुंबई पोलिसांवरील ताण अधिकच वाढला असून हा ताण कमी करण्यासाठी मुंबईत निमलष्करी दलाच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे निमलष्करी दलाच्या तुकड्या पाठविण्याची मागणी केली होती. आतापर्यंत केंद्र सरकारने नऊ तुकड्या राज्यात पाठविल्या आहेत. यातील पाच तुकड्याची तैनाती मुंबईत होत आहे. 
दरम्यान, देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक लाख पाच हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या ६४ दिवसात देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या १०० वरून १ लाखांच्या पुढे पोहोचली आहे. ही  बाब चिंता वाढविणारी ठरते . मात्र त्याचवेळी देशातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. तसेच देशात या साथीमुळे होणारा मृत्यूचा दर कमी आहे. भारतात प्रति लाख लोकसंख्येच्या प्रमाणात 0.2 मृत्यू होत असून जागतिक पातळीवर हेच प्रमाण 4.1  इतके आहे, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे. तसेच देशात आतापर्यंत कोरोनाच्या २४ लाख चाचण्या झाल्या आहेत, असेही आरोग्य विभागाने जाहीर केले. 

leave a reply