ट्रम्प यांच्या धमकीनंतर ‘डब्ल्यूएचओ’कडून कोरोनाच्या स्वतंत्र चौकशीची घोषणा

वॉशिंग्टन,  (वृत्तसंस्था) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘डब्ल्यूएचओ’ चीनच्या हातातील बाहुले बनले आहे असे टीकास्त्र सोडून या संघटनेचा निधी कायमस्वरूपी रोखण्याची धमकी दिली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर  ‘डब्ल्यूएचओ’ने कोरोना साथीची स्वतंत्र चौकशी करण्याच्या मागणीला मान्यता दिली आहे. त्यामुळे चीनच्या इशाऱ्यावर काम करणारी ‘डब्ल्यूएचओ’ सध्या तरी अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावापुढे झुकल्याचे दिसत आहे.
 
कोरोना साथीच्या मुद्यावर चीन व ‘डब्ल्यूएचओ’ला सातत्याने लक्ष्य करणाऱ्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी सोमवारी नवा हल्ला चढविला. “‘डब्ल्यूएचओ’ हे चीनच्या हातातील कळसूत्री बाहुले आहे. त्यांनी कायम चीनच्याच बाजूने काम केले असून आम्हांला खूपच वाईट सल्ले दिले आहेत”, असा आरोप ट्रम्प यांनी केला. हा हल्ला चढविल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पत्राद्वारे ‘डब्ल्यूएचओ’ला नवी धमकीही दिली.
 
‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रॉस घेब्रेयेसुस यांना लिहिलेल्या पत्रात ट्रम्प यांनी, संघटनेत ३० दिवसांच्या आत महत्त्वाच्या सुधारणा घडवाव्यात, अशी मागणी केली आहे. या सुधारणा घडविल्या नाहीत तर अमेरिका ‘डब्ल्यूएचओ’चे फंडिंग कायमचे बंद करून टाकेल व संघटनेतून बाहेर पडेल, अशा शब्दात अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी धमकी दिली. अमेरिका ‘डब्ल्यूएचओ’ला तब्बल ४० कोटी डॉलर्सहून अधिक निधी देते तर चीन जेमतेम ८ कोटी डॉलर्स, असे सांगून ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली होती. 
 
टेड्रॉस व ‘डब्ल्यूएचओ’ने सातत्याने केलेल्या घोडचुकांची मोठी किंमत जगाला मोजावी लागली, असा आरोपही ट्रम्प यांनी आपल्या पत्रात केला आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांकडून एकामागोमाग करण्यात आलेल्या या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ‘डब्ल्यूएचओ’ने सोमवारी ‘कोरोना’ साथीची स्वतंत्र चौकशी करण्याच्या मागणीला मान्यता दिली आहे. यावेळी  कोरोना साथीच्या हाताळणीत काही कमतरता राहिल्याचीही कबुलीही ‘डब्ल्यूएचओ”ने दिली. 
 
दरम्यान, अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय समुदायाकडून हातमिळवणीचे आरोप होत असतानाही चीनने ‘डब्ल्यूएचओ’ला तब्बल दोन अब्ज डॉलर्सचे सहाय्य देत असल्याची घोषणा केली आहे.

leave a reply