तुर्की-सिरियातील प्रलयंकारी भूकंपात 23 हजारांहून अधिक जणांचा बळी

- तीस लाखांहून अधिक जण विस्थापित - रस्ते खचल्यामुळे मदतकार्यात अडचणी - आंतरराष्ट्रीय संघटनांकडून मदतीचे आवाहन

23 हजारांहून अधिकअंकारा – तुर्की व सिरियाला हादरवून सोडणाऱ्या भीषण भूकंपात किमान 23 हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. दोन्ही देशांमध्ये शेकडो इमारतींचे ढिगारे उपसण्याचे काम सुरू असल्यामुळे बळींची संख्या वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या भागातील रस्ते मोठ्या प्रमाणात खचल्यामुळे मदतकार्यासाठी निघालेली वाहने व जवान भूकंपग्रस्तांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे मदतकार्यात अडचणी येत असल्याचा दावा केला जातो. दरम्यान, वर्ल्ड बँक तसेच इतर संघटनांनी भूकंपग्रस्तांसाठी तातडीच्या अर्थसहाय्याची घोषणा केली आहे.

सोमवारी 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने तुर्की तसेच सिरियाला हादरवून सोडले. या भूकंपामधील बळींची संख्या 20 हजारांवर जाईल, अशी भीती जागतिक आरोग्य संघटना-डब्ल्यूएचओने व्यक्त केली होती. पण या ठिकाणाची झालेली वाताहात पाहिल्यानंतर बचावकार्य करणाऱ्या संघटना बळींची संख्या याहून अधिक असेल, असा दावा करीत आहेत. शुक्रवारी तुर्कीच्या सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार सदर भूकंपामध्ये 19,338 जणांचा बळी गेला तर 77 हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. तर सिरियातील बळींची संख्या चार हजारांच्या जवळ पोहोचली असून 22 हजार जण जखमी आहेत.

तुर्की व सिरियामध्ये बचावकार्य करणाऱ्या तसेच वैद्यकीय उपचार देणाऱ्या संघटनांसमोर मोठी आव्हाने उभी असल्याची माहिती समोर येत आहे. येथील शवागरे भरल्यामुळे मृतदेह ठेवण्यासाठी जागाच उरलेली नाही. तर मृतदेह पुरण्यासाठी देखील दफनभूमीत जागा नसल्याची हादरवून टाकणारे दावे माध्यमांनी केले आहेत. सोमवारच्या भूकंपाने 500 हून अधिक इमारती कोसळल्या आहेत. तर भूकंपानंतरही तुर्कीला शंभरहून अधिक हादरे बसले आहेत. त्यामुळे भूकंपाच्या पहिल्या हादऱ्यात जर्जर झालेल्या इमारतीही कोसळत असल्याचे दावे केले जात आहेत.

त्यातच या भूकंपाने रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्या असून बचावकार्यात अडचणी येत आहेत. काही भागात मदत पोहोचविणे देखील अवघड बनले आहे. विस्थापितांसाठी फुटबॉलच्या मैदानांमध्ये तंबू उभारुन तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पण विस्थापितांची संख्या लाखांमध्ये असल्यामुळे यातही अडचणी येत असल्याची तक्रार अधिकारी करीत आहेत. तुर्की-सिरियामध्ये कडाक्याची थंडी असून तापमान उणे पाचपर्यंत गेले आहे. त्यामुळे उघड्यावर असलेल्या विस्थापितांची परिस्थिती अधिकच हालाखीची बनली आहे.

तुर्कीतील भूकंपपीडितांपर्यंत सहाय्य वेगाने पोहोचत असून संयुक्त राष्ट्रसंघानेही स्वतंत्र मदत पोहोचविली आहे. पण सिरियातील भूकंपग्रस्तांना आवश्यक सहाय्य मिळत नसल्याची तक्रार येथील मानवाधिकार संघटना करीत आहे. अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी सिरियातील अस्साद सरकारवर लादलेल्या निर्बंधांचा फटका येथील भूकंपपीडितांना बसत असल्याची टीका या संघटनेने केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ तसेच पाश्चिमात्य देशांनी सिरियावरील निर्बंध मागे घ्यावे, असे आवाहन या संघटनेने केले आहे.

हिंदी

leave a reply