डीआर काँगोतील दहशतवादी हल्ल्यांमध्ये 40हून अधिक जणांचा बळी

डीआर काँगोकिन्शासा – मध्य आफ्रिकेतील ‘डीआर काँगो’मध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 40हून अधिक जणांचा बळी गेला आहे. ‘आयएस’संलग्न ‘अलाईड डेमोक्रॅटिक फोर्सेस'(एडीएफ) या दहशतवादी गटाने हे हल्ले केल्याचे समोर आले आहे. गेल्या काही महिन्यात ‘डीआर काँगो’तील इतुरी व नॉर्थ किवु प्रांतात सातत्याने दहशतवादी हल्ले होत असून लष्कर तसेच सरकार हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्याने स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.

शनिवारी पहाटे नॉर्थ किवु प्रांतातील बेनी रिजन भागात ‘एडीएफ’च्या दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात किमान 27 जणांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झाले असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. दहशतवाद्यांनी बंदुका तसेच मोठ्या सुऱ्यांच्या सहाय्याने हल्ले चढविले होते. दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने राबविलेल्या मोहिमेत सात दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यापूर्वी नॉर्थ किवु प्रांताला जोडून असलेल्या इतुरी प्रांतात दहशतवाद्यांनी निर्घृण हत्याकांड घडविल्याचे उघड झाले. इतुरी प्रांतातील इरुमु भागात 17 मृतदेह सापडले आहेत. लष्करी पथक व ‘रेडक्रॉस’ या स्वयंसेवी संघटनेने घेतलेल्या शोधमोहिमेत हे मृतदेह सापडले. या सगळ्यांचे शिर शरीरापासून धडावेगळे करण्यात आलेे होते, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. हे हत्याकांड ‘एडीएफ’नेच घडविल्याचा संशय लष्कराने व्यक्त केला आहे.

डीआर काँगोएडीएफ या संघटनेवर ‘आयएस’चा प्रभाव असून काही वर्षांपूर्वी या गटाने आपल्याला ‘आयएस’शी जोडून घेतले होते. त्यापूर्वी एडीएफचा प्रमुख जमील मुकूलू याने त्यावेळी ‘अल कायदा’चा संस्थापक ओसामा बिन लादेनची भेट घेतली होती. लादेनबरोबरच्या या भेटीनंतर जमीलने डीआर काँगोमध्ये एडीएफची स्थापना करून येथील सरकार उधळून इस्लामी राजवट प्रस्थापित करण्यासाठी दहशतवादी हल्ले सुरू केले होते. डीआर काँगोच्या उत्तरेकडील भाग व युगांडाची सीमा या ठिकाणी एडीएफचे सक्रिय आहे. गेल्या काही वर्षात त्यांच्या हल्ल्यांमध्ये चार हजारांहून अधिक नागरिकांचा बळी गेल्याचा दावा केला जातो.

एडीएफचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी डीआर काँगो व युगांडाच्या लष्कराने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून संयुक्त दहशतवादविरोधी मोहीम राबविली होती. मात्र काही आठवड्यांनंतर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरू झाल्याने, ही मोहीम अपयशी ठरल्याचे दिसत आहे.

डीआर काँगो हा देश खनिजसंपत्तीने समृद्ध देश आहे. कोबाल्ट धातूचा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून डीआर काँगोची ओळख आहे. याशिवाय या देशात तांबे आणि हिऱ्याच्या खाणी देखील आहेत. खनिजांच्या उत्खननावरच या देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. बंडखोर तसेच दहशतवादी संघटनांनी बेकायदा खाणी व खनिजांची निर्यात या बळावर आपले स्थान मजबूत केले आहे. या दहशतवादी संघटनांना इतर देशांचे पाठबळ मिळत असल्याचे आरोप करण्यात येतात.

leave a reply