सोमालियन लष्कराच्या कारवाईत अल-शबाबचे ६०हून अधिक दहशतवादी ठार

मोगादिशू – सोमालियामध्ये लष्कर आणि अल-शबाब या दहशतवादी संघटनेतील संघर्ष तीव्र होत आहे. गेल्या तीन दिवसात सोमालियन लष्कराने केलेल्या कारवाईत अल-शबाबच्या ६०हून अधिक दहशतवाद्यांचा खातमा केला. या कारवाईत आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळाल्याची घोषणा सोमालियाच्या सरकारने दिली. तर शुक्रवारी अल-शबाबच्या दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर हल्ला चढविला.

somalia al shabaabगेल्या महिन्यात २९ ऑक्टोबर रोजी अल-शबाबने राजधानी मोगादिशूमध्ये घडविलेल्या दुहेरी कारबॉम्बस्फोटात १२० जणांचा बळी गेला होता. त्यानंतर अल-शबाबच्या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सोमालियन व आफ्रिकन महासंघाच्या लष्कराने संयुक्त मोहीम छेडली होती. सोमालियाच्या लोअर शाबेले प्रांतातील बुलो-मदिनो या गावात लष्कराने केलेल्या कारवाईत ४९ हून अधिक दहशतवादी ठार झाले. या हल्ल्यात अल-शबाबचा मोठा शस्त्रसाठा नष्ट केल्याची घोषणा सोमालियन लष्कराने केली. या कारवाईसाठी सोमालियन लष्कराने हवाई हल्ल्यांचा वापर केला होता.

गेल्या काही दिवसांच्या लष्करी कारवाईत सोमालियाच्या मध्य व दक्षिणेकडील एकूण ६८ विभाग दहशतवाद्यांच्या नियंत्रणातून ताब्यात घेण्यात यश मिळाल्याचा दावा केला जातो. पण पुढच्या दोन दिवसात, शुक्रवारी अल-शबाबच्या दहशतवाद्यांनी गाल्गादूद प्रांतातील लष्कराच्या तळावर हल्ला चढवून सोमालियन सरकारला इशारा दिला. येथील कायिब गावात दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला चढविला. काही दिवसांपूर्वीच सोमालियन लष्कराने काबिय गाव अल-शबाबपासून मुक्त केले होते. त्यामुळे याच गावात आत्मघाती हल्ला चढवून अल-शबाबने सोमालियन सरकार व लष्कराला धमकावल्याचे दिसत आहे.

यानंतर सोमालियन लष्कराने केलेल्या कारवाईत अल-शबाबचे १५ दहशतवादी ठार झाले. तरीही अल-शबाबचा धोका कमी झालेला नाही, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघ व आंतरराष्ट्रीय संघटना देत आहेत. सोमालियाच्या इतर भागांमध्ये अल-शबाबचा मोठा प्रभाव असल्याचा दावा केला जातो. हा प्रभाव संपविण्यासाठी सोमालियन सरकारने अल-शबाबविरोधी टीव्ही चॅनल सुरू केले आहे. तसेच आफ्रिकन महासंघाच्या शांतीसैनिकांनी इथून माघार घेऊ नये, असे आवाहन सोमालियाच्या सरकारने केले आहे.

अल-कायदाशी संलग्न असलेल्या अल-शबाब या दहशतवादी संघटनेने २००७ सालापासून सोमालिया व शेजारी देशांमध्ये दहशतवादी हल्ले चढविले आहेत. सोमालियातील सरकार व लष्कर या दहशतवादी संघटनेच्या निशाण्यावर आहे. मधल्या काळात अल-शबाबचा प्रभाव कमी झाल्याची चर्चा सुरू झाली होती. पण २०१८ सालापासून अल-शबाबने पुन्हा सोमालियातील हल्ले वाढविले आहेत. २०१८ साली अल-शबाबच्या हल्ल्यांमध्ये ६५१ तर २०१९ साली ५९१ जणांचा बळी गेला होता.

leave a reply