चिनी मालावर बहिष्कारानंतर दिवाळीत ७२ हजार कोटींहून अधिक विक्री

विक्रीनवी दिल्ली – चिनी मालावर बहिष्कारानंतरही भारतीय व्यापाऱ्यांची दिवाळी दणक्यात साजरी झाली आहे. यावर्षी दिवाळीत भारतीय बाजारात चिनी वस्तू विकल्या गेल्या नाहीत. मात्र तरी सुद्धा ७२ हजार कोटींपेक्षा (९.७ अब्ज डॉलर्स) अधिक उलाढाल झाल्याचा दावा ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ (कॅट) या व्यापाऱ्यांच्या संघटनेने केला आहे. गेल्यावर्षीपेक्षा १० टक्क्यांनी दिवाळीतील विक्री वाढली आहे, असे ‘कॅट’ने म्हटले आहे. तसेच चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे दिवाळीत चीनचे ४० हजार कोटींचे नुकसान झाल्याचाही दावा करण्यात येतो.

चीनविरोधात देशभरात प्रचंड नाराजी असून जनतेसह व्यापारी संघटनांकडून चिनीमालाचा बहिष्कार करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यात आत्मनिर्भर भारत आणि ‘लोकल फॉर व्होकल’ला सरकार प्रोत्साहन देत आहे. देशातील ६ कोटी व्यापारी आणि व्यापाऱ्यांच्या ४० हजार लहान मोठ्या व्यापारी संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या “कॅट’ने ही यासाठी मोहीम राबविली होती. व्यापाऱ्यांनीही या मोहिमेला प्रतिसाद देत चिनी मालाची आयात न करीता भारतीय बनावटीच्या माल विक्रीस ठेवला होता.

विक्री

यामुळे याचा मोठा फटका चीन निर्यातदारांना बसला असून त्यांचे ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे दावे केले जात आहेत. २० वेगवेगळ्या शहरांमधील अग्रगण्य वितरण केंद्रातून मिळालेल्या आकडेवारीनुसार दिवाळीच्या निमित्ताने ७२ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय झाला. दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद, कोलकाता, नागपूर, रायपूर, भुवनेश्वर, रांची, भोपाळ, लखनौ, कानपूर, नोएडा, जम्मू, अहमदाबाद, सूरत, कोचीन, जयपूर, चंदीगडसह वीस शहरे वितरणाची प्रमुख केंद्र आहेत.

दिवाळीच्या काळात ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी), खेळणी, कपडे, विजेची उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्वयंपाक घरातील वस्तू, भेटवस्तू, घराच्या सजावटीच्या वस्तू, भांडी, सोने आणि दागिने, चप्पल, घड्याळ, फर्निचरची सर्वाधिक खरेदी करण्यात आल्याची नोंद करण्यात आली. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून दिवाळी साजरा करण्याच्या कॅटच्या अभियानला देशभरातून मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळाला. आणि भारतीय बनावटीच्या मालाची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. असा ‘कॅट’चा दावा आहे.

चिनी उत्पादनांशिवाय भारतीयांची दिवाळी फिकी राहील. भारतीयांना चिनी मालाशिवाय पर्याय नाही कारण भारताचे उत्पादन क्षेत्र खूपच मागासलेले आहे, असा दावा चीनच्या सरकारी मुखपत्रातून वारंवार करण्यात येत होता. मात्र चिनी माल नाकारून भारतीयांनी याला चांगलेच उत्तर दिल्याचे दिसत आहे.

leave a reply