रशिया व चीनसह दक्षिण आफ्रिकेचा समावेश असलेला ‘मोसी-२’ युद्धसराव सुरू

प्रिटोरिआ/मॉस्को – रशिया-चीन व दक्षिण आफ्रिका यांच्यातील नौदल सरावाला शुक्रवारपासून दरबानमधील सागरी क्षेत्रात सुरुवात झाली. ‘मोसी-२’ असे नाव असलेला हा सराव हिंदी महासागर क्षेत्रातील सामरिक व व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या मार्गावर पार पडणार आहे. युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना दक्षिण आफ्रिकेने रशियाबरोबर सरावाचे आयोजन केल्याने अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेने सरावाचे समर्थन केले असून सदर सराव आंतरराष्ट्रीय व संरक्षण सहकार्याचा भाग असल्याचे स्पष्ट केले.

यापूर्वी २०१९ साली दक्षिण आफ्रिकेने रशिया व चीनबरोबर संयुक्त नौदल सराव केला होता. ‘ब्रिक्स’ गटातील सहकारी देश असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेबरोबर रशिया व चीन या दोन्ही देशांनी चांगले संबंध विकसित करण्यात यश मिळविले आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी गेल्याच महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा दौराही केला होता. दौऱ्यादरम्यान त्यांनी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या संयुक्त नौदल सरावाचे समर्थन केले होते. चीन व दक्षिण आफ्रिकेबरोबर होणाऱ्या या सरावाची सगळी माहिती रशियाने पुरविली आहे, त्यामुळे त्यावरून वाद होण्याचा प्रश्नच नाही असे लॅव्हरोव्ह यांनी स्पष्ट केले होते.

रशिया-युक्रेन युद्धाला वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या सरावात सहभागी होऊन रशियाने आफ्रिका व चीनबरोबरील आपली वाढती जवळीक दाखवून दिली आहे. युक्रेनबरोबर युद्ध सुरू असताना गेल्या वर्षी रशियन जहाजांनी दक्षिण आफ्रिकेचा बंदरामध्ये मुक्कामही ठोकला होता. दक्षिण आफ्रिकेसह अनेक आफ्रिकी देशांनी युक्रेन युद्धात उघड भूमिका घेण्याचे टाळले आहे. या मुद्यावर अमेरिका व युरोपिय देशांनी टाकलेला दबाव आफ्रिकी देशांनी झुगारल्याचे समोर आले आहे. ही बाब पाश्चिमात्य आघाडीला अस्वस्थ करणारी ठरते.

दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ‘मोसी-२’या सरावात रशियाची ‘ॲडमिरल गोर्शकोव्ह’ ही विनाशिका सहभागी होणार असल्याची माहिती रशियाकडून देण्यात आली. या विनाशिकेवर रशियाने ‘झिरकॉन’ ही हायपरसोनिक क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. रशियाने दिलेल्या माहितीनुसार ध्वनीच्या नऊ पट वेग असणाऱ्या या क्षेपणास्त्रांचा पल्ला एक हजार किलोमीटर्सहून अधिक आहे. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या सरावात झिरकॉन क्षेपणास्त्राची चाचणीही घेण्यात येणार आहे. रशियाबाहेर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सरावात झिरकॉनची चाचणी होण्याची ही पहिलीच घटना ठरणार आहे.

‘ॲडमिरल गोर्शकोव्ह’व्यतिरिक्त रशियाचा एक ऑईल टँकरही सरावाचा भाग असणार आहे. दक्षिण आफ्रिकेकडून एक विनाशिका तर चिनी नौदलातील दोन विनाशिकांसह एक सपोर्ट व्हेसल सरावात सहभागी असल्याची माहिती दक्षिण आफ्रिकेकडून देण्यात आली.

leave a reply