‘एफएटीएफ’च्या कारवाईमुळे धास्तावलेल्या पाकिस्तानकडून दहशतवाद्यांवर कारवाईचा देखावा

लाहोर – फेब्रुवारी महिन्यात ‘फायनॅन्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ची (एफएटीएफ) बैठक पार पडणार आहे. सध्या ‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्ये असलेल्या पाकिस्तानला या बैठकीत ब्लॅक लिस्ट करण्यात येईल, अशी चिंता सतावू लागली आहे. ही कारवाई टाळण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू झाली आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ‘मौलाना मसूद अझहर’ याच्यावर कारवाईचा देखावा उभा करून पाकिस्तान आपल्यावरील दडपण कमी करू पाहत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या ‘झकीउर रेहमान लख्वी’ याला पाकिस्तानी यंत्रणांनी अटक केल्याची बातमी आली होती. हा देखील पाकिस्तान उभे करीत असलेल्या कारवाईचा नाटकाचा भाग असल्याचे दिसते.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरानवाला येथील ‘अँटी टेररिझम कोर्ट’ने (एटीसी) मसूद अझहरच्या विरोधात वॉरंट जारी केले आहे. अझहरवर दहशतवाद्यांना पैसे पुरविण्याचा आरोप आहे. तसेच प्रक्षोभक साहित्य पुरवित असल्याचे किरकोळ आरोपही अझहरवर ठेवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात ‘जैश’सारख्या खतरनाक दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असलेल्या मसूद अझहरने भारतात भयंकर घातपात घडविले आहेत. २०१९ सालच्या फेब्रुवारी महिन्यात जम्मू व काश्मीरच्या पुलवामा येथे आत्मघाती हल्ला चढवून ‘जैश’ने सीआरपीएफच्या ४० जवानांना शहीद केले होते. हा घातपात ‘मसूद अझहर’च्या इशार्‍यानेच घडविण्यात आला होता. त्याच्या आधी अझहर याने भारतात दहशतवादी हल्ले घडविले होते आणि भारताच्या संसदेवरील हल्लाही अझहरनेच घडवून आणला होता.

असे असताना, अझहरवर त्याच्या गुन्ह्यांच्या तुलनेत किरकोळ आरोप ठेवून पाकिस्तान आपल्या न्यायालयाद्वारे कारवाई करण्याचे भ्रामक चित्र उभे करीत आहे. अझहर पाकिस्तानच्या बहावलपूर येथील ‘सेफ हाऊस’मध्ये असल्याचे बोलले जाते. पाकिस्तानची कुप्रसिद्ध गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ अझहरला संरक्षण पुरवित आली आहे. अशा परिस्थितीत अझहरवर पाकिस्तानात कठोर कारवाई होणे शक्यच नाही. मात्र ‘एफएटीएफ’च्या दबावामुळे पाकिस्तानला कारवाईचे हे नाटक करणे भाग पडले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा प्रभाव वाढत चालला आहे. याचे परिणाम दिसू लागले आहेत. यामुळेच ‘एफएटीएफ’च्या फेब्रुवारी महिन्यात भारत पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट करण्यात यशस्वी ठरेल, या भीतीने पाकिस्तानला ग्रासले आहे.

अशा परिस्थितीत दहशतवाद्यांचे आर्थिक स्त्रोत खंडीत करण्यासाठी कारवाई करणे ही पाकिस्तानची गरज बनली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या ‘झकीउर रेहमान लख्वी’ याला पाकिस्तानच्या यंत्रणांनी ताब्यात घेतले होते. त्याच्यावरही अझहरप्रमाणेच मामुली आरोप ठेवून पाकिस्तानने कडक कारवाई टाळल्याचे दिसत आहे. मात्र पाकिस्तानच्या या हालचालींवर आपली नजर रोखलेली असल्याचे अमेरिकेने बजावले होते.

दरम्यान, अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले चढविणारा तालिबानचा हक्कानी गट पाकिस्तानच्या भूमीचा वापर करूनच या कारवाया करीत आहे. हक्कानी नेटवर्कचे नेते पाकिस्तानातच वास्तव्य करून आहेत. मात्र सध्याच्या काळात ‘एफएटीएफ’च्या कारवाईचा धोका वाढलेला असताना, पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कच्या या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानच्या हेल्मंड प्रांतात रवाना केले आहे.

leave a reply