अमेरिकेच्या संसदेकडून बायडेन-हॅरिस यांच्या विजयावर शिक्कामोर्तब

- सत्तेच्या हस्तांतरणासाठी तयार असल्याची राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टन – बुधवारी दुपारी झालेल्या अभूतपूर्व हिंसाचारानंतर उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स व संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी, ‘ज्यो बायडेन-कमला हॅरिस’ यांच्या विजयाला संसदेने मान्यता दिल्याचे जाहीर केले. हिंसक निदर्शकांना संसदेच्या बाहेर काढल्यानंतर पुन्हा आयोजित करण्यात आलेल्या सत्रात इलेक्टोरल कॉलेजच्या निकालांना मंजुरी देण्यात आली. या मंजुरीनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, निकाल मान्य नसला तरी सत्तेच्या सुरळीत हस्तांतरणास आपण तयार असल्याचे वक्तव्य केले आहे.

बुधवारी उशिरा संसदेत आयोजित करण्यात आलेल्या सत्रात ट्रम्प यांच्या समर्थक असलेल्या संसद सदस्यांनी घेतलेले सर्व आक्षेप फेटाळण्यात आले. सिनेटमध्ये सदर प्रस्ताव ९२विरुद्ध ७ मतांनी नाकारण्यात आला. तर प्रतिनिधीगृहात ३००हून अधिक सदस्यांनी आक्षेपांच्या विरोधात मतदान केले. त्यानंतर पहाटे पावणेचारच्या सुमारास उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स व सभापती नॅन्सी पेलोसी यांनी ‘बायडेन-हॅरिस’ यांच्या निवडणुकीतील विजयाला संसद मान्यता देत असल्याची घोषणा केली. या घोषणेमुळे २० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याचा ज्यो बायडेन यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

संसदेच्या निर्णयानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एक निवेदन जारी करून हस्तांतरणासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले. ‘निवडणुकीचा निकाल आपल्याला मान्य नाही आणि ही गोष्ट मला खटकणारी असली तरी २० जानेवारी रोजी सुरळीत हस्तांतरण पार पडेल. निवडणुकीतील फक्त कायदेशीर मतांचीच मोजणी व्हावी, यासाठी सुरू असलेला आपला संघर्ष यापुढेही चालू राहिल. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय इतिहासातील पहिल्या सर्वोत्तम कारकिर्दीची आता अखेर झाली आहे. मात्र ही अमेरिकेला पुन्हा श्रेष्ठ बनविण्याच्या आपल्या संघर्षाची सुरुवात आहे’, असे ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

त्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्यावर टीकास्त्र सोडले. पेन्स यांच्याकडे देश व राज्यघटना सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक कृती करण्याचे धैर्य नसल्याचा ठपका ट्रम्प यांनी ठेवला. उपराष्ट्राध्यक्ष पेन्स यांनी संसदेत झालेल्या हिंसाचारावर तीव्र नाराजी व्यक्त करून, ‘हिंसा कधीच विजयी होत नाही व स्वातंत्र्य नेहमीच विजयी ठरते’, अशी प्रतिक्रिया नोंदविली आहे. दरम्यान, रिपब्लिकन तसेच डेमोक्रॅट पक्षाच्या सदस्यांकडून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईसाठी हालचाली सुरू झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

leave a reply