अफगाणिस्तानविषयक परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवल यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली

मॉस्को – रशियाने आयोजित केलेल्या अफगाणिस्तानविषयक बैठकीत सहभागी झालेले भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. या भेटीत द्विपक्षीय तसेच क्षेत्रिय मुद्यांवर चर्चा पार पडल्याचे सांगितले जाते. या चर्चेत अफगाणिस्तानात भारत व रशियाची धोरणात्मक भागीदारी यापुढेही कायम ठेवण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून दुसऱ्या देशांमध्ये दहशतवादाची निर्यात करण्याचा परवाना कुणालाही देता येणार नाही, असे या अफगाणिस्तानविषयक बैठकीत डोवल यांनी बजावले. थेट नामोल्लेख न करता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी याद्वारे पाकिस्तानला लक्ष्य केल्याचे दिसत आहे.

National Security Advisor Doval meets Russian Presidentभारतासह इराण, कझाकस्तान, किरगिझिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान व चीन या देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रशियाने आयोजित केलेल्या अफगाणिस्तानविषयक बैठकीत सहभागी झाले होते. यात पाकिस्तानचा समावेश नव्हता, ही लक्षणीय बाब ठरते. याआधी 2021 साली भारताच्या नवी दिल्लीत तर 2022 साली तजिकिस्तानाच्या दुशांबे येथे अफगाणिस्तानविषयक बैठक पार पडली होती. रशियात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत अफगाणिस्तानातील परिस्थितीवर सखोल चर्चा पार पडली. या क्षेत्राच्या बाहेरील देशांकडून अफगाणिस्तानवर प्रभाव टाकण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यासाठी हे देश दहशतवादविरोधी कारवायांच्या सबबी पुढे करीत आहेत. पण त्या दिशेने या देशांचे काम सुरू नाही, अशी चिंता यावेळी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी व्यक्त केली. तर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी अफगाणिस्तानात सक्रीय असलेल्या दहशतवादी संघटनांचा बिमोड करणे आवश्यक असल्याची जाणीव करून दिली.

आयएस, लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या विरोधात गोपनीय माहिती व सुरक्षाविषयक सहकार्य करणे सर्वच देशांच्या सुरक्षा संघटनांसाठी आवश्यक ठरते, असे अजित डोवल यावेळी म्हणाले. संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी घोषित केलेल्या संघटनांना अफगाणिस्तानात थारा मिळता कामा नये व अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवाद पसरविण्यासाठी वापर होता कामा नये, अशी अपेक्षा देखील यावेळी डोवल यांनी व्यक्त केली.

याबरोबरच अफगाणिस्तानच्या खनिजसंपत्ती व नैसर्गिक स्त्रोतांवर डल्ला मारू पाहणाऱ्या चीनलाही डोवल यांनी टोला लगावला. अफगाणिस्तानच्या खनिजसंपत्ती व स्त्रोतांवर पहिला अधिकार अफगाणी जनतेचाच असावा, असे डोवल म्हणाले. याबरोबरच संकटाच्या काळात भारत अफगाणिस्तानच्या जनतेमागे ठामपणे उभा असून भारत अफगाणी जनतेला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, असे डोवल पुढे म्हणाले. गेल्या दीड वर्षाच्या कालाधीत भारताने अफगाणिस्तानाला 40 हजार मेट्रिक टन इतका गहू, 60 टन इतकी औषधे, पाच लाख कोरोनाच्या लसी, हिवाळ्यासाठी 28 टन गरम कपडे व इतर मानवतावादी सहाय्य पुरविले आहे, अशी माहितीही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी दिली.

दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचा दौरा केला होता. भारत व अमेरिकेमधील ‘इनिशिएटीव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज्‌‍-आयसीईटी’ परिषदेसाठी डोवल अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन व परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन आणि संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्याशी चर्चा केली होती. भारत एकाच वेळी अमेरिका व रशियाबरोबरील संबंधात समतोल साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे अजित डोवल यांच्या अमेरिका व रशिया भेटीतून समोर येत आहे.

leave a reply