रशियाला ड्रोन्स पुरविणाऱ्या इराणवर अमेरिकेचे निर्बंध

वॉशिंग्टन – युक्रेनमधील युद्धात रशियाला ड्रोन्स पुरविणाऱ्या इराणच्या कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. या सहाय्याद्वारे इराण युद्धगुन्हे करीत असल्याचा आरोप अमेरिकेने ठेवला आहे. इराणने अमेरिकेचे हे आरोप फेटाळले. काही तासांपूर्वीच अमेरिकेने अल्बानियावरील सायबर हल्ल्यांसाठी इराणला दोषी धरून निर्बंधांची कारवाई केली होती. इराणबरोबरचा बहुचर्चित अणुकरार रखडलेला असताना, अमेरिकेने हे निर्बंध लादून इराणला इशारा दिल्याचा दावा केला जातो.

Iranian dronesगेल्या सहा महिन्यांपासून युक्रेनमध्ये जोरदार युद्ध पेटलेले आहे. या युद्धामध्ये रशियाचे जबर नुकसान होत असल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत. रशिया इराण, उत्तर कोरियाकडून शस्त्रास्त्रांची मागणी करीत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. युक्रेनच्या लष्करावर हल्ला चढविण्यासाठी रशियाने इराणकडून ड्रोन्सची खरेदी केल्याचे अमेरिका व ब्रिटीश यंत्रणांनी म्हटले होते. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सशी संबंधित कंपन्या यासाठी रशियाला सहाय्य करीत असल्याचा आरोप झाला होता.

या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या कोषागार विभागाने ड्रोननिर्मिती करणाऱ्या इराणच्या तीन कंपन्या आणि एका अधिकाऱ्यावर निर्बंध जाहीर केले. यामध्ये परावर पार्स, डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ एअरक्राफ्ट इंजिन्स (डामा) आणि बाहरेस्तान किश या तीन कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी परावर पार्स कंपनीने रिव्हर्स इंजिनिअरिंगद्वारे अमेरिका व इस्रायली बनावटीच्या ड्रोन्सची नक्कल तयार केल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर या युद्धकाळात रशियाच्या लष्करी विमानांना सेवा पुरविणाऱ्या तेहरानमधील ‘सफिरान’ हवाईतळावरही निर्बंध लादण्यात आले आहेत.

आपल्या कंपन्यांवर निर्बंध लादणाऱ्या अमेरिकेचे आरोप इराणने फेटाळले आहेत. काही तासांपूर्वी अमेरिकेने इराणवर सायबर हल्ल्याअंतर्गत निर्बंध लादले होते. इराणने आमच्या सरकारी व लष्करी यंत्रणांवर सायबर हल्ले चढविल्याचा ठपका अल्बानियाने ठेवला होता. नाटोचा सदस्य देश असलेल्या अल्बानियाच्या आरोपांचे समर्थन करून अमेरिकेने इराणवर हे निर्बंध लादले होते. पण अल्बानियाच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे इराणने म्हटले होते.

दरम्यान, युक्रेनमधील युद्धात रशियाच्या शस्त्रसाठ्याचे जबरदस्त नुकसान झाल्याच्या बातम्या ब्रिटिश व युरोपिय माध्यमांमध्ये येत आहेत. युक्रेनविरोधी युद्धासाठी रशियाकडे पुरेसा शस्त्रसाठा नसल्याचे दावेही ही माध्यमे करीत आहेत. तर दुसरीकडे रशियाने ‘वोस्तोक’ युद्धसरावामध्ये मोठ्या संख्येने शस्त्रास्त्रे उतरवून पाश्चिमात्य माध्यमांचे दावे खोडून काढले आहेत. आठवडाभर चाललेल्या या युद्धसरावाद्वारे रशियाने आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी केला होता.

leave a reply