रशियाला कमकुवत करण्यासाठी युक्रेनमधील युद्ध दीर्घकाळ लांबविण्याचा नाटोचा डाव

- तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप

रशियाला कमकुवतअंकारा/मॉस्को – ‘नाटोतील काही सदस्य देशांना युक्रेन युद्ध दीर्घकाळपर्यंत लांबवायचे आहे. युक्रेनमधील युद्ध अनेक वर्षे चालू राहिल्यास त्याचा वापर रशियाला कमकुवत करण्यासाठी होऊ शकतो. या देशांना युक्रेनमधील परिस्थितीची काहीही पर्वा नाही’, असा आरोप तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलुत कावुसोग्लु यांनी केला. काही दिवसांपूर्वीच अमेरिका व नाटो युक्रेनला आर्थिक व लष्करी सहाय्य पुरवून हे युद्ध दहा वर्षांसाठी लांबेल, याची तजवीज करीत असल्याचा आरोप चिनी मुखपत्राने केला होता. या पार्श्वभूमीवर नाटोचाच सदस्य देश असणाऱ्या तुर्कीच्या मंत्र्यांनी केलेला आरोप लक्ष वेधून घेणारा ठरतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गुरुवारी युक्रेनला 1.3 अब्ज डॉलर्सच्या मदतीची घोषणा केली. यातील 80 कोटी डॉलर्स संरक्षणसहाय्य असून 50 कोटी डॉलर्स अर्थसहाय्य आहे. अमेरिकेने गेल्या 15 दिवसात युक्रेनला मोठ्या शस्त्रसहाय्याची घोषणा करण्याची ही दुसरी वेळ आहे. अमेरिकेबरोबरच जर्मनीने युक्रेनला एक अब्ज युरोहून अधिक संरक्षणसहाय्य पुरविण्याचे जाहीर केले आहे. नाटोचे सदस्य असणाऱ्या या दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी युक्रेनमधील युद्ध दीर्घकाळ चालू ठेवण्यासंदर्भात वक्तव्ये केली आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनीही याबाबत वारंवार दावे केले आहेत.

रशियाला कमकुवतयुक्रेनमधील युद्ध खूप काळ चालू राहू शकते, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले होते. ‘कोणत्याही परिस्थितीत रशियाला जिंकू द्यायचे नाही यावर पाश्चिमात्य देशांचे एकमत झाले आहे. रशियाविरोधी संघर्ष कायम ठेवण्यासाठी पाश्चिमात्य देश युक्रेनला अधिकाधिक काळ शस्त्रपुरवठा सुरू ठेवतील’, असे जर्मन चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी बजावले. तर युक्रेन पुढील 10 वर्षे रशियाविरोधातील युद्ध लढू शकतो, असा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला होता.

या सर्व पार्श्वभूमीवर नाटोचा सदस्य देश असणाऱ्या तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी युक्रेन युद्धाबाबत दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो. रशियाचे राष्ट्राध्यक्ष तसेच वरिष्ठ मंत्र्यांनीही अमेरिकेसह नाटो देशांना युक्रेनचा वापर रशियाविरोधात करायचा असल्याकडे लक्ष वेधले होते. त्याचवेळी रशियाची युद्धातील उद्दिष्टे स्पष्ट असून ती पूर्ण झाल्यावर रशिया युद्धातून बाहेर पडेल, अशी ग्वाहीदेखील रशियन नेतृत्त्वाने दिली आहे. काही विश्लेषकांनी युक्रेनच्या रुपात दुसरा अफगाणिस्तान तयार करण्याचा डाव असल्याचेही दावे केले होते.

leave a reply