सौदी, युएई व बाहरिन इस्रायलला विरोध करणाऱ्यांचे वैरी बनतात

- हौथी बंडखोर संघटनेच्या प्रमुखाचा आरोप

सना – ‘सौदी अरेबिया, युएई आणि बाहरिन हे इस्रायल व अमेरिकेच्या अधीन गेले आहेत. इतकेच नाही तर इस्रायलशी शत्रूत्व घेणारा देश किंवा संघटनेचे हे तीनही अरब देश वैरी बनतात’, असा आरोप येमेनमधील हौथी बंडखोर संघटनेचा प्रमुख अब्दुल-मलिक अल-हौथी याने केला. तसेच सौदी, युएई व बाहरिनला इस्लामी देशांमध्ये शांती आणि स्थैर्य नको असल्याचा ठपका अब्दुल-मलिकने ठेवला आहे.

वैरीराष्ट्राध्यक्ष मन्सूर हादी यांचे सरकार उलथून येमेनचा ताबा घेण्यासाठी गृहयुद्ध छेडणाऱ्या हौथी बंडखोर संघटनेच्या प्रमुखाने दोन दिवसांपूर्वी स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये हौथी बंडखोर संघटनेचा प्रमुख अब्दुल-मलिक अल-हौथी याने इस्रायलसह सौदी अरेबिया, युएई आणि बाहरिन या देशांवर ताशेरे ओढले. यासाठी अब्दुल-मलिकने सौदी, युएई व बाहरिनच्या राष्ट्रप्रमुखांचा थेट उल्लेख केला.

‘क्षेत्रीय शांती आणि स्थैर्य प्रस्थापित करीत असल्याचा खोटा दावा करून बाहरिनचे अल खलिफा आणि युएईचे अल नह्यन यांची राजवट व सौदीच्या राजघराण्याने इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित केले आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या बाजूने उभे राहिले तरी काही फरक पडत नाही, असा या अरब देशांचा समज झाला आहे’, अशी टीका अब्दुल-मलिक अल-हौथीने केली.

वैरीयानंतर हौथी बंडखोर संघटनेच्या प्रमुखाने अरब देशांवर गंभीर आरोप केले. ‘सौदी, युएई आणि बाहरिनमध्ये जुलमी राज्यकर्ते बसलेले आहेत. इस्लामी देशांमध्ये शांती व स्थैर्य प्रस्थापित व्हावी, असे या तीनही देशांना वाटत नाही. याउलट आपला पैसा, माध्यमप्रचार आणि राजकीय प्रभाव वापरून देशद्रोहाचे बीज रोवण्यासाठी हे अरब देश पूर्णपणे जबाबदार आहेत’, असा ठपका अब्दुल-मलिकने ठेवला. त्याचबरोबर सौदी, युएई आणि बाहरिन इस्रायलला विरोध करणाऱ्यांचे वैरी बनतात, असा दावा हौथीच्या प्रमुखाने केला. तर इस्रायलशी सहकार्य प्रस्थापित करणाऱ्या अरब देशांनी आपल्या प्रभावाखाली असलेल्या माध्यमांमध्ये पॅलेस्टिनी सशस्त्र संघटनांचा उल्लेख दहशतवादी असा केल्याचा आरोप अब्दुल-मलिकने केला. आपल्या या आरोपांसाठी हौथी बंडखोर संघटनेच्या प्रमुखांनी कुठलाही पुरावा देण्याचे नाकारले.

दरम्यान, 2015 सालापासून येमेनमधील हादी सरकार आणि हौथी बंडखोर संघटनेत गृहयुद्ध भडकले आहे. गेल्याच आठवड्यात सौदी व संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने येमेनमध्ये संघर्षबंदी लागू करण्यात आली. पण तोपर्यंत राष्ट्राध्यक्ष हादी यांच्या सरकारच्या समर्थनार्थ सौदी अरेबिया, युएई, बाहरिन, इजिप्त या अरब मित्रदेशांच्या आघाडीने हौथी बंडखोरांविरोधात युद्ध पुकारले होते. सौदी, युएईने हौथी बंडखोरांना दहशतवादी घोषित केले आहे.

leave a reply