गलवानच्या संघर्षानंतर नौदलाने केलेली तैनाती संदेश देणारी

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

कोची – ‘शांती अपेक्षित असली तरी आपण कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत, हे गलवानच्या संघर्षानंतर भारतीय नौदलाने सजगपणे केलेल्या तैनातीद्वारे दाखवून दिले’, असे सूचक विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केले. कोची येथील नौदलाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी आपल्या या विधानांचे तपशील दिले नाहीत. ‘‘पुढच्या वर्षी स्वदेशी बनावटीची ‘विक्रांत’ ही विमानवाहू युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल. यामुळे नौदलाची क्षमता, विस्तार आणि सामर्थ्य प्रचंड प्रमाणात वाढणार असून देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षासाठी हे यथोचित अभिवादन ठरेल’’, असे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.

गलवानच्या संघर्षानंतर नौदलाने केलेली तैनाती संदेश देणारी - संरक्षणमंत्री राजनाथ सिंगपुढच्या दहा ते बारा वर्षात भारतीय नौदलाला जगातील तिसर्‍या क्रमांकावर नेण्याचे ध्येय देशाने समोर ठेवले पाहिजे, अशी महत्त्वाकांक्षा संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली. कारवारमधील ‘प्रोजेक्ट सीबर्ड’ची आपण पाहणी करून आलो व हा भारताचा सर्वात मोठा नौदल तळ बनेल. पण हा केवळ भारतच नाही तर हा आशियातील सर्वात मोठा नौदलतळ व्हावा, अशी आपली इच्छा असल्याचे राजनाथ सिंग म्हणाले. पुढच्या वर्षी देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. याच वर्षात स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका विक्रांतचा नौदलातील समावेश म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षासाठी यथोचित अभिवादन ठरते. या युद्धनौकेची क्षमता, व्याप्ती आणि त्यातील वैविध्य यामुळे देशाची संरक्षणविषयक क्षमता अधिकच धारदार बनेल. यामुळे सागरी क्षेत्रातील देशाचे हितसंबंध अधिक चांगल्यारितीने जपता येतील, असा विश्‍वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.

देशातील मागणीनुसार 44 युद्धनौकांपैकी 42 युद्धनौका देशातच विकसित केल्या जात आहेत, यातून संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणाला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे, हे सिद्ध होते. युद्धनौकांच्या उभारणीसाठी लागणारे पोलाद व शस्त्रे आणि सेन्सर्स यांची 75 टक्के इतक्या प्रमाणात निर्मिती देशातच होत आहे, याकडेही संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले. मात्र कोची येथील या भाषणात संरक्षणमंत्र्यांनी गलवानच्या संघर्षानंतर नौदलाने केलेल्या तैनातीचा उल्लेख करून चीनला सज्जड इशारा दिल्याचे दिसत आहे. गलवानच्या खोर्‍यात चिनी लष्कराबरोबर झालेल्या संघर्षात भारताचे 20 सैनिक शहीद झाले होते. यानंतर भारतीय नौदलाने फॉरवर्ड डिप्लॉयमेंट अर्थात आघाडीवर येऊन केलेली तैनाती म्हणजे कुठल्याही आव्हानाला तोंड देण्याची तयारी होती, याची जाणीव संरक्षणमंत्र्यांनी करून दिली. मात्र त्याचे तपशील त्यांनी दिले नव्हते.

चीनची व्यापारी वाहतूक होणार्‍या मलाक्काच्या आखातावर भारताचे नियंत्रण आहे. या आखातातून होणारी चीनची व्यापारी वाहतूक भारतीय नौदल कधीही बंद पाडू शकेल. याची जाणीव करून देणारी तैनाती भारतीय नौदलाने गलवानमधील संघर्षानंतर केली होती का, असा प्रश्‍न यामुळे उपस्थित होत आहे. मे महिन्यात अमेरिकन संसदेसमोरील सुनावणीत ‘डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी’चे जनरल डायरेक्टर स्कॉट डी. बेरिअर यांनी देखील भारतीय नौदलाने चीनच्या विरोधात केलेल्या तैनातीचा दाखला दिला होता. लडाखच्या एलएसीवर तणाव निर्माण झालेला असताना, भारतीय नौदलाने एडनच्या आखातापर्यंत चिनी युद्धनौकांचा पाठलाग केला, अशी माहिती जनरल डायरेक्टर स्कॉट बेरिअर यांनी दिली होती. भारताचे चीनविषयक धोरण आता मवाळ व उदार राहिलेले नसून भारत चीनच्या विरोधात आक्रमक तैनाती करीत आहे, याची जाणीव याद्वारे लेफ्टनंट जनरल बेरिअर यांनी करून दिली होती.

या पार्श्‍वभूमीवर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी गलवानच्या संघर्षानंतरच्या नौदलाने केलेल्या तैनातीची चीनला पुन्हा एकदा आठवण करून दिल्याचे दिसत आहे. पुढच्या काळातही भारत अशी कारवाई करू शकतो, असा संदेश भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी चीनला दिल्याचा दावा रशियन वृत्तसंस्थेने केला आहे.

leave a reply