नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा धोका – ब्रिटनमधून भारतात येणार्‍या विमानांना स्थगिती

नवी दिल्ली – ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. यानंतर भारतानेही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. बिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी सकाळी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी एक तातडीची बैठक बोलावली होती. तसेच या विषाणूचा शिरकाव भारतात झाल्यास देशात गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते, हा धोका ओळखून ब्रिटन-भारत विमान सेवा ताबडतोब स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र जनतेला घाबरण्याचे कारण नसून सरकार सतर्क आहे व आवश्यक ते निर्णय घेत असल्याची ग्वाही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली.

गेल्या आठवड्यात ब्रिटनमध्ये वेगाने फैलावणार्‍या कोरोनाच्या विषाणूचा नवा प्रकार समोर आला होता. कोरोनाच्या विषाणूच्या या नव्या प्रकारामुळे ही साथ फैलावण्याचा वेग ७० टक्क्यांनी वाढला आहे. ब्रिटनमध्ये यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर होत असून लॉकडाऊनचे नियम कठोर करण्यात आले आहेत. ब्रिटनने या कोरोनाच्या या नव्या प्रकाराची माहिती जाहीर करताच आजूबाजूच्या देशांनी ब्रिटनबरोबर लागून असलेल्या आपल्या सीमा बंद केल्या आहेत. तसेच विमान सेवाही थांबविली आहे. याशिवाय इतर देशही अशाच प्रकारचे निर्णय घेत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जॉईंट मॉनिटरिंग ग्रुपची एक तातडीची बैठक सोमवारी बोलाविली होती. यावेळी एम्स, आयसीएमआरचे वरिष्ठ अधिकार्‍यांसह जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना केंद्र सरकारने अ‍ॅलर्ट जारी केल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिली. संशोधक या नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूबाबतच्या घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असे हर्ष वर्धन म्हणाले. या स्थिती काय निर्णय घ्यायची, कोणती अंमलबजावणी करायची याची पूर्ण कल्पना सरकारला आहे. यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही, अशी ग्वाही हर्ष वर्धन यांनी दिली.

तसेच भारताने एअर बबल कराराअंतर्गत ब्रिटनमधून भारतात येणार्‍या विमान सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ तारखेला मध्य रात्रीपासून ही विमानसेवा बंद करण्यात येईल. याआधी ब्रिटनमधून भारतासाठी उड्डाण केलेल्या प्रवाशांची विमानतळावर उतरताच आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येईल, असे नागरी उड्डयन मंत्रालयाने म्हटले आहे. सध्यातरी ३१ डिसेंबरपर्यंत विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका क्षेत्रांमध्ये रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. ही संचारबंदी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे. युरोपिय देशांमधून भारतात येणार्‍या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी विमातळानजीकच स्वतंत्र क्वारंटाईन व्यवस्था केली जाणार आहे. तसेच इतर देशांतून येणार्‍या नागरिकांना होम क्वारंटाईन व्हावे लागेल.

leave a reply