चीनमध्ये कोरोना साथीचा नवा उद्रेक

- राजधानी बीजिंग व वुहानसह १८ प्रांतांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले

बीजिंग – कोरोना साथीचा उगम असलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा साथीचा नवा उद्रेक झाल्याचे समोर आले आहे. राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर ‘हैदिअन’ भागात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. बीजिंगपाठोपाठ वुहान शहरातही कोरोनाचे सात रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. या दोन शहरांसह १८ प्रांतामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले असून, या नव्या उद्रेकाचा फटका चीनच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

चीनमध्ये कोरोना साथीचा नवा उद्रेक - राजधानी बीजिंग व वुहानसह १८ प्रांतांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळलेराजधानी बीजिंगच्या ‘गुओशिंग कम्युनिटी’ भागात कोरोनाचा नवा रुग्ण आढळला असून या कम्युनिटीसह आजूबाजूच्या पाच भागांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या भागातील सर्व नागरिकांच्या दोन दिवस चाचण्या घेऊन मग पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती स्थानिक रेडिओ चॅनलने दिली आहे. राजधानी बीजिंगमधील नागरिकांनाही नोटिस जारी करण्यात आली असून ठोस कारणाशिवाय शहर सोडू नये, असे बजावण्यात आले आहे.

बीजिंगमधील पर्यटकांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. चीनच्या इतर प्रभावित शहरांमधून बीजिंगला येणारी विमाने, ट्रेन्स व बसेस बंद करण्यात आल्या आहेत. गुओशिंगमध्ये आढळलेल्या रुग्णापूर्वी बीजिंगमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण आढळले होते. त्यामुळे राजधानीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या चार झाली आहे. राजधानी बीजिंगपाठोपाठ कोरोनाचे उगमस्थान असणार्‍या वुहान शहरातही पुन्हा नवे रुग्ण आढळले आहेत.

‘वुहान इकॉनॉमिक अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजिकल डेव्हलमपेंट झोन’मधील सात कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. वुहानमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळण्याची वर्षभरातील ही पहिलीच घटना ठरली आहे. राजधानी बीजिंग व वुहानसह चीनच्या १८ प्रांतांमधील २७ शहरांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचे समोर येत आहे. चिनी यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार नान्जिंग, झुजोउ व झेंगजिआजी ही तीन शहरे नव्या संक्रमणाचे केंद्र ठरली आहेत. झुजोउ व झेंगजिआजीमध्येही गेल्या आठवड्यातच लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

सोमवारी चीनच्या विविध भागांमध्ये ५५ रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या ३६०वर गेली आहे. नान्जिंग, झुजोउमध्ये सापडलेले रुग्ण ‘डेल्टा व्हेरिअंट’चे असल्याची माहिती चिनी यंत्रणांकडून देण्यात आली. या नव्या उद्रेकामुळे पर्यटन व इतर उद्योगांना फटका बसला असून त्याचे परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर होतील, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

leave a reply