अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांच्या टीकेनंतर चीनच्या लढाऊ विमानांची तैवानजवळ नवी गस्त

तैपेई – चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीची 31 लढाऊ विमाने आणि चार विनाशिकांनी तैवानच्या हद्दीजवळून धोकादायक गस्त घातली. आधीच सावध असलेल्या तैवानच्या लष्कराने लढाऊ विमाने रवाना करून चिनी विमानांना माघार घेण्यास भाग पाडले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन लवकरच चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी ब्लिंकन यांनी चीन तैवानच्या क्षेत्रात यथास्थिती बदलण्याच्या तयारीत असल्याची टीका केली होती. त्यानंतर चीनने तैवानच्या दिशेने विमाने रवाना करून अमेरिकेला इशारा दिल्याचे दिसते.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या लष्कराने सकाळी सहा वाजता तैवानच्या दिशेने लढाऊ विमाने व विनाशिका रवाना केल्या होत्या. यापैकी 12 लढाऊ विमानांनी तैवानच्या आखातातील ‘मिडियन लाईन’ ओलांडल्याचा आरोप संरक्षण मंत्रालयाने केला. चीन आणि तैवानमधील आंतरराष्ट्रीय वादाच्या पार्श्वभूमीवर, हवाई हद्द म्हणून ही मिडियन लाईन निश्चित करण्यात आली आहे. सदर हवाई हद्दीचा आदर करणे चीनसाठी बंधनकारक आहे. तरी देखील चीनच्या लढाऊ विमानांनी याआधी अनेकवेळा सदर मिडियन लाईन पार करून तैवानच्या हवाई सुरक्षेला आव्हान दिले आहे.

गेल्या वर्षी अमेरिकन लोकप्रतिनिधीच्या तत्कालिन सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर चीनच्या या आक्रमकतेमध्ये वाढ झाली आहे. त्यानंतर अमेरिकेसह, फ्रान्स व जपानच्या लोकप्रतिनिधींनी तैवानचा दौरा केला आहे. यावर संताप व्यक्त करून चीनने तैवानच्या हवाई व सागरी हद्दीजवळची गस्त वाढविली आहे. काही दिवसांपूर्वीच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला तैवानविरोधी कारवाईसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती संख्या, बेरोजगारी, आर्थिक संकट आणि विस्कळीत झालेली पुरवठा साखळी यामुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमोरील आव्हाने वाढली आहेत. अशा परिस्थितीत, चिनी जनतेचा विश्वास मिळविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग तैवानवर हल्ल्याची आगळीक करू शकतात, अशी चिंता तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी व्यक्त केली आहे. चीनची लढाऊ विमाने आणि विनाशिकांची वाढती घुसखोरी म्हणजे प्रत्यक्ष हल्ल्याआधीची तयारी असल्याचा दावा तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला होता.

तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांचे उत्तराधिकारी विल्यम लाई देखील चीनच्या विस्तारवादी धोरणांपासून जगाला सावध करीत आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनविरोधात कठोर भूमिका स्वीकारावी, असे आवाहन विल्यम लाई यांनी केले आहे. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा देखील तैवानच्या सुरक्षेला प्राथमिकता देत आहेत. यासाठी जपानच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला आवाहन केले होते. पण अमेरिकेचे बायडेन प्रशासन तैवानला शस्त्रसज्ज करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका जोर पकडत आहे. अमेरिकेच्या या नरमाईच्या धोरणामुळे चीन तैवानवर हल्ला चढविल, असे इशारे आंतरराष्ट्रीय विश्लेषक देत आहेत.

leave a reply