अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून उडत्या तबकड्यांच्या अभ्यासासाठी नवा ‘टास्क फोर्स’

‘टास्क फोर्स’वॉशिंग्टन – परग्रहवासिय व उडत्या तबकड्यांसंदर्भात समोर येणार्‍या माहितीचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेच्या संरक्षण विभागाने नवा ‘टास्क फोर्स’ स्थापन केल्याचे जाहीर केले. काही महिन्यांपूर्वी ‘ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स’ या गुप्तचर यंत्रणेने सादर केलेल्या अहवालानुसार ‘टास्क फोर्स’ उभारण्यात येत असल्याचे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. जून महिन्यात ‘पेंटॅगॉन’ने सादर केलेल्या अहवालात, २००४ सालापासून आढळलेल्या उडत्या तबकड्यांच्या घटनांमागे परग्रहवासिय असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही, असा दावा करण्यात आला होता.

अमेरिकेचा संरक्षण विभाग गेल्या अनेक वर्षांपासून परग्रहवासिय व उडत्या तबकड्यांची माहिती गोळा करीत आहे. मात्र त्यासंदर्भात उघड कबुली देण्यात आली होती. डिसेंबर २०१७ मध्ये, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने पहिल्यांदाच पृथ्वीवर आढळलेल्या उडत्या तबकड्यांच्या घटनांची चौकशी सुरू केल्याची कबुली दिली होती. त्यावेळी अमेरिकेच्या संरक्षण विभागाने २००७ ते २०१२ या कालावधीत, उडत्या तबकड्यांच्या अभ्यासासाठी ‘ऍडव्हान्सड् एव्हिएशन थ्रेट आयडेंटिफिकेशन प्रोग्राम(एएटीआयपी) राबविल्याची माहितीही दिली होती.

‘टास्क फोर्स’गेल्या वर्षी संरक्षण विभागाकडून, ‘अनआयडेंटिफाईड एरिअल फेनॉमेनॉ टास्क फोर्स’ची स्थापना करण्यात आली होती. नवा टास्क फोर्स याच गटाची सुधारित आवृत्ती आहे. नव्या टास्क फोर्सचे नाव ‘एअरबोर्न ऑब्जेक्ट आयडेंटिफिकेशन ऍण्ड मॅनेजमेंट सिंक्रोनायझेशन ग्रुप’(एओायएमएसजी) असे ठेवण्यात आले आहे. या टास्क फोर्सवर उडत्या तबकड्यांच्या प्रत्येक घटनेची माहिती घेणे, विश्‍लेषण करणे इतर विभागांशी समन्वय ठेवणे, अशा घटकांकडून असलेल्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर धोरण तयार करणे अशा जबाबदार्‍या असतील. अमेरिकेच्या उपसंरक्षणमंत्री कॅथलीन हिक्स यांनी याची माहिती दिली.

गेल्या काही वर्षात अमेरिकेतील काही अधिकारी तसेच संसद सदस्य सातत्याने परग्रहवासिय व उडत्या तबकड्यांचा मुद्दा उपस्थित करीत आहेत. २०१७ व २०१८ साली अमेरिकी प्रसारमाध्यमे तसेच काही गटांकडून उडत्या तबकड्यांचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आले होते. सप्टेंबर २०१९मध्ये अमेरिकी नौदलाने हे व्हिडिओ खरे असल्याचीही कबुली दिली होती.

leave a reply