जगभरातील माध्यमांमध्ये उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांच्या मृत्यूची चर्चा

वॉशिंग्टन/बीजिंग – उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांच्या मृत्यूबाबत आंतरराष्ट्रीय माध्यमांकडून खळबळजनक दावे करण्यात येत आहेत. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीशी निगडित हॉंगकाँगमधील एका वृत्तवाहिनीने किम जोंग ऊन यांचा मृत्यू झाल्याची बातमी दिली. तर जपानच्या साप्ताहिकाने किम जोंग ‘ब्रेन डेड’ झाल्याचा दावा केला आहे. दक्षिण कोरियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र कोरियन हुकूमशहा किम जाँग जिवंत असल्याची माहिती दिली आहे. अधिकृत पातळीवर या दाव्यांना कोणत्याही देशाने दुजोरा दिलेला नाही.काही दिवसांपूर्वीं दक्षिण कोरियाच्या एका वेबसाईटने किम जाँग ऊन यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे वृत्त दिले होते. त्यानंतर चीनने एक विशेष पथक उत्तर कोरियात धाडल्याची माहिती समोर आली होती. चीनच्या या पथकात चीनमधील डॉक्टर्स व इतर अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले होते.

चिनी पथकाच्या भेटीच्या या वृत्तानंतर आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये कोरियन हुकूमशहाच्या मृत्यूबाबतच्या दाव्यांना अधिकच वेग आला आहे. हॉंगकॉंगमधील ‘एचकेएस टीव्ही’ या वृत्तवाहिनीने चीनमधील सूत्रांच्या आधारे किम जाँग ऊन यांच्या मृत्यूबाबत दावा केला आहे. ही वृत्तवाहिनी चीनच्या सत्ताधारी राजवटीशी संबंधित असल्याचे सांगण्यात येते.

जपानमधील ‘शुकन गेंदई’ या साप्ताहिकाने किम जाँग ऊन ‘ब्रेन डेड’ असल्याचा दावा केला आहे. किम जाँग ऊन यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याचे जपानी साप्ताहिकाच्या बातमीत म्हंटले आहे.

अमेरिकेचे वरिष्ठ सेनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी, ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, किम जाँग ऊन यांच्या मृत्यूची बातमी आली नाही तर आपल्याला आश्चर्य वाटेल, असे वक्तव्य करून खळबळ उडवली आहे. गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जाँग ऊन यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त नाकारले होते. या पार्श्वभूमीवर ग्रॅहम यांचे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

मात्र दक्षिण कोरियातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशहा ऊन यांची प्रकृती चांगली असल्याचा दावा केला आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ‘मून जाए इन’ यांच्या सल्लागारांनी ही माहिती दिली. आमच्या सूत्रांकडून आलेल्या माहितीनूसार, किम जाँग ऊन यांची प्रकृती व्यवस्थित आहे, असे दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षीय सल्लागारांनी म्हंटले आहे.

यापूर्वी 2014 सालीही किम जाँग ऊन तब्बल एक महिना प्रकृतीच्या कारणामुळे कोरियन जनता व माध्यमांपासून गायब होते. त्यानंतर उत्तर कोरियाच्या सरकारी टीव्हीने त्यांचे व्हिडिओ प्रसिद्ध केले होते.

किम जाँग ऊन यांचे वडील व उत्तर कोरियाचे माजी हुकूमशहा किम जोंग दुसरे यांचे 2011 साली हृदयविकाराच्या झटक्यानेच निधन झाले होते. त्यानंतर किम जाँग ऊन यांनी सत्ता हाती घेतली होती. किम जाँग ऊन सध्या ३५ वर्षांचे असून त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांची छोटी बहीण किम यो जोंग सत्ता हाती घेईल असाही दावा करण्यात येतो.

leave a reply