देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २७ हजाराच्या पुढे

नवी दिल्ली – देशात कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या ८५० पुढे, तर या साथीच्या रुग्णांची संख्या २७,५०० च्या पुढे पोहोचली आहे. रविवारी महाराष्ट्रातच १९ जण दगावले असून ४४० नवे रुग्ण आढळले. यामुळे राज्यातील कोरोनाव्हायरसची लागण झालेल्यांची संख्या ८ हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबईत दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाला आणि ३२४ नवे रुग्ण आढळले.

देशात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. शनिवारी सायंकाळपासून रविवारीच्या संध्याकाळपर्यंत याकाळपर्यंत देशात १९७५ नवे रुग्ण सापडले. २४ एप्रिल रोजी चोवीस तासात १७५२ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर तीनच दिवसाने चोवीस तासात सर्वधिक रुग्ण सापडल्याचा नवा उच्चांक झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात या साथीत बळी गेलेल्यांची संख्या ८२६, तर रुग्णांची संख्या २६,९१७ झाली आहे. मात्र ही संख्या रविवार सायंकाळपर्यंतच्या माहितीवर आधारलेली आहे. तर दिवसभरात विविध राज्यात सापडलेल्या एकूण रुग्ण संख्येचा यामध्ये समावेश नाही.

महाराष्ट्रच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी रात्री जाहीर केलेल्या माहितीनुसार राज्यात दिवसभरात ४४० नवे रुग आढळले आहेत. गुजरातमध्येही २३० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत ९७ आणि राजस्थानात ६९ नवे सापडले आहेत. यामुळे देशात कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या ८५० च्या पुढे, तर एकूण रुग्णांची संख्या २७५०० च्या पुढे गेल्याचे स्पष्ट होते.

दरम्यान, महाराष्ट्रात आणखी एका पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत यात दोन पोलिसांचा बळी गेला आहे. या पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये आणि सरकारी नोकरी देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले.

leave a reply