पुलवामा हल्ल्याप्रकरणी ‘एनआयए’चे १३,८०० पानांचे आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली – गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या वाहनांवर भीषण हल्ला घडविणार्‍या १९ दहशतवाद्यांविरोधात ‘राष्ट्रीय तपास संस्था’ने (एनआयए) १३,८०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यात ‘जैश-ए-मोहम्मद’चा प्रमुख मसूद अझहरसह त्याचा भाऊ रौफ असगरचा समावेश आहे. या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानमध्येच रचल्याचे ‘एनआयए’ने म्हटले. ‘जैश’ जम्मू आणि काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला घडविणाच्या तयारीत होती. पण भारतीय वायुसेनेच्या बालाकोटमधील हवाई हल्ल्यानंतर ‘जैश’ला भारतात मोठा दहशतवादी हल्ला करता आला नसल्याचे ‘एनआयए’ने म्हटले.

आरोपपत्र

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी ‘जैश’च्या दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये स्फोटकांच्या सहाय्याने आत्मघाती हल्ला चढविला. यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याप्रकरणी ‘एनआयए’ने मंगळवारी १९ दहशतवाद्यांविरोधात १३,८०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. यातील सहा दहशतवादी ठार झाले आहेत. तर सात जणांना अटक करण्यात आली. तसेच पाच जण बेपत्ता असून यातील तिघेजण पाकिस्तानमध्ये असल्याचे ‘एनआयए’ने म्हटले.

आरोपपत्र

पाकिस्तानमधील ‘मोहम्मद उमर फारुक’ हा पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार होता. २०१८ साली त्याने पाकिस्तानमधून भारतात घुसखोरी केली होती. त्यानेच पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमार्गे २० किलो आरडीएक्स आणले होते. तर अमोनियम नायट्रेट आणि इतर स्फोटके इंटरनेटवरुन खरेदी केली होती. या वर्षीच्या मार्च महिन्यात सुरक्षादलाने त्यालाही ठार केले. तर अदिल दर हा आत्मघाती हल्लेखोर होता.

आरोपपत्र

‘एनआयए’ने तीन दहशतवाद्यांचे फोटोग्राफ्स आणि मोहम्मद उमर फारुखचे ओळखपत्र जारी केले आहे. तसेच ‘एनआयए’ला मोहम्मद उमर फारुखचा फोन सापडला आहे. त्यात दहशतवाद्यांचे कॉल रेकॉर्डिंग, संभाषण, सोशल मीडियावरील ग्रुप ही सर्व माहिती आहे. ‘जैश’च्या स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने हा हल्ला घडविण्यात आल्याचे ‘एनआयए’ने स्पष्ट केले. दरम्यान, पुलवामाच्या हल्ल्यामागे पाकिस्तानच असल्याच्या दाव्याला ‘एनआयए’च्या आरोपपत्रांमुळे पुष्टी मिळाली आहे.

leave a reply