पाकिस्तानची ‘आयएसआय’ भारतात हल्ला घडविण्याच्या तयारीत

इस्लामाबाद – पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ भारतात मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘आयएसआय’च्या वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत जम्मू आणि काश्मीरमध्ये हल्ला घडविण्याविषयी कट शिजल्याची खबर भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा हाय-अलर्टवर गेल्या आहेत. गेल्या वर्षी पुलवामामध्ये हल्ला होण्याआधी जैश आणि ‘आयएसआय’मध्ये अशाच स्वरूपाची बैठक पार पडली होती.

भारतात हल्ला

गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात ‘सीआरपीएफ’चे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याचा कट पाकिस्तानमध्ये शिजल्याचे ‘राष्ट्रीय तपास संस्था’ने (एनआयए) आपल्या हजारो पानांच्या आरोपपत्रात म्हटले आहे. या हल्ल्यासाठी ‘जैश’चा प्रमुख मौलाना मसूद अझहर आणि त्याचा भाऊ अब्दुल रौफ अशगर याच्या विरोधात ‘एनआयए’ने आरोपपत्र दाखल केले आहे. ‘जैश’चा प्रमुख मसूद अझहर आजारी असल्याने सध्या ‘जैश’ची सूत्रे अशगरकडे आहे. हाच अशगर रावळपिंडीमध्ये ‘आयएसआय’च्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत उपस्थित होता. यावेळी ‘जैश’चा कमांडर मौलाना अम्मर या बैठकीत हजर होता, याकडे गुप्तचर यंत्रणा लक्ष वेधत आहेत.

पुलवामावरील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने बालाकोटमधील दहशतवाद्यांच्या सर्वात मोठ्या तळावर हल्ला चढविला होता. या हल्ल्यात जैश तसेच इतर दहशतवादी संघटनांचे कमांडर्स, दहशतवादी व कट्टरपंथी ठार झाले होते. या हल्ल्यानंतर मौलाना अम्मर याने भारतात हल्ला चढविण्याची धमकी दिली होती. त्यामुळे आयएसआय आणि जैशच्या या बैठकीतील अम्मरची उपस्थिती धोक्याची सूचना ठरत असल्याचा दावा केला जातो. २० ऑगस्टला झालेल्या या बैठकीत भारतात विशेषतः जम्मू आणि काश्मीरमध्ये हल्ला चढविण्याविषयी चर्चा झाली. भारतीय गुप्तचर यंत्रणांना याची खबर मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये हाय-अलर्ट जारी करण्यात आला असून येथील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे.

भारतात हल्ला

गेल्या काही वर्षांपासून भारतात सुरक्षाव्यवस्था वाढल्यामुळे आणि दहशतवाद्यांच्या स्लिपर्स सेल्सचे सुरक्षादलाने कंबरडे मोडल्यामुळे ‘आयएसआय’ला भारतात हल्ले घडविणे अशक्य झाले आहे. यामुळे ‘आयएसआय’ अस्वस्थ झाली आहे. यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा भारतातील लोकल गँगस्टर्सच्या मदतीने भारतात हल्ले चढविण्याची तयारी करीत असल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली होती. तसेच स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘जैश’ जम्मू आणि काश्मीरमध्ये हल्ला चढविण्याच्या तयारीत होती. पण कडक सुरक्षेमुळे आणि सुरक्षा दलाच्या धडक कारवाईमुळे हा कट उधळला गेला.

leave a reply