जम्मू-काश्मीरमधील निष्पाप नागरिकांच्या हत्यांचा तपास ‘एनआयए’कडे

- ‘आयएसआय’च्या कटाची माहिती उघड

श्रीनगर/नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांनी केलेल्या निष्पाप नागरिकांच्या हत्यांचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविण्यात आला आहे. गुप्तचर खात्याकडून मिळणार्‍या सूचना आणि काही दिवसांपूर्वी एनआयएने जम्मू-काश्मीरमध्ये टाकलेल्या धाडीतून काही धागेदोरे एनआयएला मिळाले होते. त्यानंतर ११ हत्यांपैकी ६ प्रकरणांचा तपास एनआयएने आपल्या हातात घेतल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात जम्मू-काश्मीरमध्ये एनआयएकडून आणखी काही छापे पडू शकतात, अशी माहिती मिळत आहे. या कटामागे ‘आयएसआय’ असल्याची माहितीही उघड झाल्याच्या बातम्या येत आहेत.

Pune-IS-Khorasan-NIAजम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित, तसेच स्थलांतरीत मजूरांच्या हत्यांचे सत्र दोन आठवड्यांपूर्वी सुरू झाले होते. तसेच त्याआधी काही स्थानिक पोलिसांनाही दहशतवाद्यांनी अशाच प्रकारे लक्ष करण्यात आले होते. पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआयने हा कट आखला असून तालिबानच्या हाती अफगाणिस्तानची सत्ता आल्यावर दहशतवाद्यांना आता जम्मू-काश्मीरमध्ये वळविले जात आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये सप्टेंबर महिन्यात आयएसआयने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांबरोबर चर्चा केली होती. यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये करवायांचा कट रचण्यात आला.

असंख्य लहान दहशतवादी संघटना बनवून हे हल्ले करण्यात येत आहेत. जेणेकरून याचा थेट संबंध पाकिस्तानची जोडला जाणार नाही. तसेव लोन वुल्फ पद्धत अवलंबण्यात आली आहे. छोट्या शस्त्रांनिशी काश्मीर बाहेरील राज्यातील नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्यामध्ये दहशतवाद माजविण्याच्या सूचना दहशतवाद्यांना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील टूलकिट काही माध्यमांनी आपल्या हाती आल्याचा दावा केला आहे. लश्कर-ए-तोयबाचे नाव बदललेले रुप असलेल्या द रजिस्टन्ट फ्रन्टच्या (टीआरएफ) सज्जाद गुल या कमांडरचे नावही या टूलकिटप्रकरणी समोर येत असून सोशल मीडियाद्वारे दहशतवाद्यांपर्यंत निर्देश देण्यात आल्याचे वृत्त आहे.

या सर्व पार्श्‍वभूमीवर सुरक्षा आणि तपास यंत्रणांनी मोठे कारवाई हाती घेतली आहे. गेल्या दोन आठवड्यात ११ निष्पाप नागरिकांच्या हत्या दहशतवाद्यांनी केल्या होत्या. यातील सहा हत्यांचा तपास हा एनआयएने हाती घेतला आहे. यामध्ये काश्मिरी पंडित माखनलाल बिंदरू, तसेच श्रीनगरमधील दोन शिक्षकांच्या हत्यांचा समावेश आहे. आठ दिवसांपूर्वी एनआयएने जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे ३२ ठिकाणी छापे टाकले होते. तसेच यादरम्यान दहशतवाद्यांच्या शेकडो पाठिराख्यांचीही धरपकड झाली होती. यातून एनआयएच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याची माहिती मिळत आहे.

leave a reply