‘आयएस-खोरासान` मॉड्यूल प्रकरणात पुण्यात एनआयएचे छापे

पुणे – भारतात दहशतवादी हल्ल्यांचा कट, आयएस खोरासानचा भारतात प्रचार करणे व दहशतवादी कारवायांसाठी पैसे गोळा करण्याच्या प्रकरणात पुण्यात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छापे टाकले. या प्रकरणात आधीच सहा जण अटकेत आहेत. तर पुण्यात ज्या संशयित दहशतवाद्यांच्या घरी धाड टाकण्यात आली, त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे व डिजिटल पुरावे जप्त केल्याची माहिती समोर येत आहे.

मार्च 2020 दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या जामियानगरमधील ओखला विहार भागातून जाहनझिब सामी वाणी आणि हिना बशिर बेग नावाच्या एका जोडप्याला ‘आयएस-खोरासान` या दहशतवादी संघटनेसाठी काम करीत असल्याप्रकरणी अटक केली होती. देशात सीआयआय कायद्याविरोधात निदर्शने सुरू असताना या दोघांकडून दंगली भडकाविण्याचा कट आखला जात होता.

दोन वर्षांपूर्वी ‘आयएस-खोरासान`च्या दिल्लीत उघड झालेल्या या मॉड्यूल प्रकरणी सोमवारी पुण्यात छापे टाकण्यात आले. पुण्याच्या कोंढवा भागात एका घरात ही छापेमारी झाली. हे घर तलाह खान नावाच्या व्यक्तीचे असून त्याचा संबंध या ‘आयएस-खोरासान` मॉड्यूलशी असल्याचा दावा केला जातो. याचे तपशील एनआयएकडून उघड करण्यात आलेले नाहीत. मात्र काही डिजिटल पुरावे एनआयएच्या हाती लागल्याच्या बातम्या आहेत. तसेच या प्रकरणात आणखी छापे पडल्याची शक्यता आहे.

याआधी या प्रकरणात ओखला विहारमधून अटक जोडप्या व्यतिरिक्त अब्दुल बशित, सादिया अन्वर शेख, नाबिल सादिक खत्री आणि अब्दुर रहमान या चार जणांना अटक झालेली आहे. तसेच या प्रकरणात या सहाही जणांवर एनआयए न्यायालयात आरोपपत्रही दाखल झाले आहे. यामध्ये या सर्वांवर आयएस खोरासानचा भारतात प्रचार, दहशतवादी कारवायांसाठी पैसे गोळा करणे, शस्त्र जमा करणे, स्फोटके बनविणे आणि टार्गेट किलिंगचे आरोप आहेत.

यातील अब्दुल बाशितला 2018 सालीच एनआयएने अटक केली होती. ही अटक अबूधाबी मॉड्यूल प्रकरणी झाली होती. भारतात सोशल मीडीयाद्वारे तरुणांना भडकावून त्यांना इराक-सिरियामध्ये आयएससाठी लढण्यासाठी पाठविण्याचे मॉड्यूल होते. बाशित हा 2014 साली आयएसमध्ये भरती होण्यासाठी बांगलादेशमार्गे सिरियात जाण्याच्या प्रयत्नात असतान पकडला गेला होता. मात्र बासित आणि त्याच्याबरोबर पडकल्या गेलेल्या दोघांना पोलिसांनी इशारा देऊन सोडले होते. 2015 साली त्याला पुन्हा श्रीनगर, पाकव्याप्त काश्‍मिरमार्गे अफगाणिस्तानात जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक झाली होती. तर 2016 साली त्याचे नाव अबूधाबी मॉड्यूल प्रकरणात समोर आले. बासित त्यानंतर तिहार कारागृहात राहून भारतात दहशतवादी कारवायांचा कट आखत होता. दिल्लीतील ओखला विहारमधून 2020 साली अटक करण्यात आलेल्या जोडप्याच्या चौकशीत ही बाब समोर आली होती. दहशतवादी संघटनेमध्ये तो खुरासनी नावाने प्रसिद्ध होता.

दरम्यान, ‘आयएस-खोरासान` मॉड्यूल प्रकरणात अटकेत असलेले नाबिल सादिक खत्री व सादिया शेख यांना पुण्यातच अटक झाली होती. विशेष म्हणजे ताज्या धाडी या प्रकरणानंतर दोन वर्षाने पुन्हा पुण्यातच पडत आहेत.

leave a reply