इराणवरून निक्की हॅले यांचा बायडेन यांना सज्जड इशारा

निक्की हॅलेवॉशिंग्टन – ‘इराणच्या नेत्यांना कुरवाळण्यापेक्षा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अणुकरारातून माघार घेतली आणि इराणवर निर्बंध लादून सर्वाधिक दबाव टाकला. याच निर्बंधांमुळे इराणची अर्थव्यवस्था कोसळली आहे. या परिस्थितीत अमेरिकेच्या लष्करावर हल्ले चढविण्यासाठी आणि आपल्या दहशतवादी कारवायांना पैसा पुरविण्यासाठी इराणच्या राजवटीला निधीची आवश्‍यकता आहे. त्यामुळे अणुकरारात पुन्हा सामील होऊन इराणला सवलत देऊ नका’, अशा खणखणीत शब्दात अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना खडसावले आहे.

अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन इराणबरोबर नव्याने अणुकरार करण्यासाठी उत्सुक आहेत. गेल्या आठवड्यात अमेरिकी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून बायडेन यांनी तसे स्पष्ट केले होते. तर इराणने देखील बायडेन यांच्याकडून आपल्याला अपेक्षा असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्‍वभूमीवर, संयुुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमधून अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना इराणवरुन सज्जड इशारा दिला.

निक्की हॅले

‘आधी जसा अणुकरार झाला होता, तसाच अणुकरार इराणला आत्ताही हवा आहे. या अणुकरारातून इराणला निर्बंधांतून सवलत आणि अमेरिकेच्या मोजक्या अटींच्या मोबदल्यात भरघोस आर्थिक सवलत हवी आहे. केवळ अल्प मुदतीच्या निर्बंधांना सामोरे जाऊन इराणला आपला अण्वस्त्रनिर्मितीचा कार्यक्रम पुढे रेटायचा आहे, इराणच्या राजवटीला आखातात दहशतवाद्यांना पैसा पुरवायचा आहे आणि आपल्या क्षेपणास्त्रांची निर्मिती वाढवायची आहे’, असे हॅले म्हणाल्या.

तर ‘अणुकरार करण्यासाठी इराण विश्‍वासार्ह आणि भरवशाचा देश नाही. अणुकरारानंतरही युरेनियमचे संवर्धन करणारा, दहशतवादाचा प्रायोजक आणि अमेरिका व इस्रायलच्या विनाशाच्या घोषणा देणारा इराणवर विश्‍वास ठेवता येणार नाही. काही दिवसांपूर्वी इराणच्या संसदेतही अमेरिकेच्या विनाशाच्या घोषणा देण्यात आल्या आहेत’, याची आठवण हॅले यांनी करून दिली.

पण भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन इराणबरोबरील नव्या अणुकरारावर ठाम आहेत. तर बायडेन सत्तेवर येईपर्यंत इराणवर अधिकाधिक निर्बंध लादले जातील, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

leave a reply