‘एलएसी’वर तणाव कमी करण्यासाठी एकतर्फी प्रयत्न होणार नाही – भारताचा चीनला स्पष्ट संदेश

नवी दिल्ली – सीमेवरील तणाव कमी करणे, शांतता राखणे द्विपक्षीय संबंधावर आधारलेले आहे. त्यामुळे चीनने वरिष्ठ अधिकऱ्यांमधील चर्चेत ठरल्याप्रमाणे लडाखमधील तणाव कमी करण्यासाठी आवश्यक ती पावले पावले प्रामाणिकपणे उचलावीत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला बजावले आहे. यापुढे भारत शांततेसाठी एकतर्फी पुढाकार घेणार नाही, असा स्पष्ट संदेश यातून चीनला देण्यात आला आहे.

'एलएसी'

भारत आणि चीनच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सीमेवर तणाव कमी करण्यासाठी ‘एलएसी’ वरून सैनिकांना मागे घेण्याचा व तैनाती कमी करण्याचा निर्णय घेतला होता. १४ जुलै रोजी ही बैठक पार पडली होती. या चौथ्या टप्प्यातील चर्चेत चीनला पॅंगोंग सरोवर आणि इतर भागातून जवानांना मागे घेण्यासंदर्भात निर्णय झाला होता. यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली होती, अशी बातमी समोर आली होती. मात्र चीनकडून याबद्दल अद्याप कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. उलट चीनकडून तैनाती वाढविल्या जात असल्याच्या बातम्या आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने चीनला कठोर शब्दात संदेश दिला आहे.

लवकरच पुढील टप्प्यातील चर्चेसाठी भारत आणि चीनचे अधिकारी भेट घेणार असून त्याआधी भारताने चीनला सणसणीत शब्दात चीनला फटकारले आहे. ”एलएसी’वर शांतात राखण्यासाठी द्विपक्षीय प्रयत्न करण्यात येतील. एकतर्फी यथास्थिती बदलण्याचा कोणी प्रयत्न करणार नाही, असे १९९३ पासून भारत आणि चीनमध्ये झालेल्या निरनिराळ्या करारात दोन्ही देशांनी स्वीकारले आहे.” याची आठवण परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी चीनला करून दिली.

राजनैतिक आणि लष्करी पातळीवर सीमेवरील शांततेसाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र यथास्थिती बदलण्याचा कोणताही प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. चीनने प्रामाणिकपणे बैठकीत ठरल्याप्रमाणे तणाव कमी करण्यासाठी पावले उचलावीत, अशी भारताची अपेक्षा आहे, असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. १५ जून रोजी गलवानमध्ये चीनने विश्वासघात करून भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. येथून सैनिक मागे जातील असे चर्चेत ठरले असतानाही चिनी जवान पुन्हा या भागात परतले होते. या विश्वासघातानंतर चीनच्या बाबतीत सदैव सतर्कतेचे धोरण भारताने स्वीकारले असून आता शांततेसाठी भारत एकतर्फी प्रयत्न करणार नाही, असा संदेश चीनला देण्यात येत आहे

leave a reply