देशातील कोरोनाच्या रूग्णांची संख्या पावणे तेरा लाखांवर; बळींची संख्या ३० हजारांच्या पुढे पोहोचली

नवी दिल्ली – देशातील कोरोनाची रुग्णसंख्या पावणे तेरा लाखांवर पोहोचली आहे. तसेच या साथीच्या बळींची संख्या ३० हजारांच्या पुढे गेली आहे. बुधवारी एका दिवसात देशात ४५ हजार नवे रुग्ण आढळले होते. गुरुवारी रात्रीपर्यंत देशात आणखी तितक्याच रुग्णांची नोंद झाल्याचे स्पष्ट होते. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर नोंद होत असल्याने या राज्यांमध्ये चिंता वाढल्या आहेत. या राज्यांमध्ये हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये लॉकडाऊन कडक करण्यात येत आहे.

कोरोनाच्या रूग्णांची संख्या

गुरुवारी महाराष्ट्रात २९८ जण दगावले आणि ९,८९५ नवे रूग्ण आढळले. मुंबईत दिवसभरात ५५ जणांचा बळी गेला, तसेच १,२४५ नवे रुग्ण सापडले. पुण्यात १,८०१, पिंपरी-चिंचवडमध्ये ९५०, औरंगाबाद शहरात १८२, सोलापूर १७१ तर नाशिकमध्ये कोरोनाचे ३८३ नवे रूग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या १२,८५४ वर पोहोचली आहे. तर एकूण रुग्णसंख्या साडेतीन लाखांवर जवळ पोहोचली आहे.

तामिळनाडूत एका दिवसात ६,४७२ रूग्ण आढळले तर ८८ रूग्ण दगावले आहेत. या राज्यातील रुग्णसंख्या १,९२,९६४ वर पोहोचली आहे. तामिळनाडूच्या राजभवनातील ८४ कर्मचारी कोरोनाग्रस्त असल्याचे आढळले आहे. तसेच आंध्रप्रदेशात चोवीस तासात ७९९८ नवे रूग्ण आढळले असून ६१ रुग्णांचा मृत्यू या साथीमुळे झाला आहे. या राज्यातील एकूण रुग्णसंख्या ७२, ७११ वर पोहोचली आहे. कर्नाटकात चोवीस तासात ९६ जणांचा बळी गेला आणि ५,०३० नव्या रूग्णांची नोंद झाली.

पश्चिम बंगालमध्ये ही कोरोनाचा फैलाव वाढला असून चोवीस तासात २, ४३६ नवे रूग्ण आढळल्याने या राज्यातील एकूण रुग्ण संख्या ५० हजारापर्यंत पोहोचली आहे. राजधानी दिल्लीत गुरुवारपर्यंत १,०४१ नवे रूग्ण आढळले आहेत, तर एका दिवसात २६ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान कोरोना चाचणी अहवाल येण्यास किमान ४८ तासांचा कालावधी लागतो. मात्र भारत आणि इस्रायल मिळून कोरोनाच्या चाचणीचा अहवाल ३० सेकंदात मिळेल असे तंत्रज्ञान विकसित करणार आहेत. कोरोनाच्या वेगवान चाचणी किट विकसित करण्याचा संयुक्त प्रयत्नांचा भाग म्हणून लवकरच इस्रायल लवकरच उच्चस्तरीय संशोधन पथक भारतात पाठवणार आहे. दरम्यान कोरोनाची लस विकसित होईपर्यंत कोरोनाव्हायरस विरुद्ध लढा भारतीयांनी जोमाने सुरू ठेवायला हवा,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले.

leave a reply