उत्तर कोरियाचा क्षेपणास्त्र कार्यक्रम हा वाढता धोका

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांचा इशारा

वॉशिंग्टन/टोकिओ – उत्तर कोरियाचा आण्विक व क्षेपणास्त्र कार्यक्रम हा वाढता धोका असल्याचा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिला. बुधवारी उत्तर कोरियाने हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचे जाहीर केले होते. यावर प्रतिक्रिया देताना ब्लिंकन यांनी हा इशारा दिला.

उत्तर कोरियाचा क्षेपणास्त्र कार्यक्रम हा वाढता धोका - अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांचा इशाराउत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हायपरसोनिक क्षेपणास्त्राने 700 किलोमीटर्स अंतरावरील लक्ष्य भेदण्यात यश मिळविले. उत्तर कोरियाने गेल्या तीन दिवसात घेतलेली ही दुसरी क्षेपणास्त्र चाचणी आहे. बुधवारी सकाळी उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचीही चाचणी घेतली होती. हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची दुसरी वेळ असल्याचा दावाही उत्तर कोरियाकडून करण्यात आला आहे. यापूर्वीची चाचणी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात घेण्यात आली होती.

बुधवारी केलेल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या चाचणीबाबत पहिली माहिती जपानच्या तटरक्षकदलाकडून देण्यात आली. त्यानंतर दक्षिण कोरियाच्या सूत्रांनी त्याला दुजोरा दिला. अवघ्या चार महिन्यांच्या अवधीत दुसरी हायपरसोनिक चाचणी घेणे ही बाब जपान व दक्षिण कोरियासाठी धोक्याचे संकेत असल्याचा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात आला आहे. नव्या चाचणीनंतर उत्तर कोरियाने गेल्या 10 महिन्यात केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांची संख्या 11वर गेली आहे.

एकापाठोपाठ करण्यात येणाऱ्या या चाचण्या म्हणजे अमेरिकेसह दक्षिण कोरिया व जपानला इशारा देण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी शांतीचर्चेसाठी पुन्हा प्रयत्न करण्याचे जाहीर केले होते. मात्र त्याला प्रयत्नांना प्रतिसाद देण्याऐवजी एकापाठोपाठ एक क्षेपणास्त्र चाचण्या घेऊन उत्तर कोरियाने आपले धोरण बदलले नसल्याचे दाखवून दिले आहे.

तीन वर्षांपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जाँग उन यांच्यादरम्यान झालेली बैठक अपयशी ठरली होती. त्यानंतर दोन देशांमधील चर्चा पूर्णपणे थांबली आहे. अमेरिकेकडून अनेकदा चर्चेची तयारी दर्शविण्यात आली असली तरी उत्तर कोरियाने त्यासाठी घातलेल्या अटी मान्य करण्याचे नाकारले आहे. निर्बंध शिथिल करणे व दक्षिण कोरियातील सैन्य मागे घेणे यासारख्या अटी उत्तर कोरियाने घातल्या आहेत. अमेरिकेने अटी नाकारल्याने उत्तर कोरियाने पुन्हा एकदा आपल्या सामर्थ्यात वाढ करण्यास सुरुवात केल्याचे नव्या चाचण्यांवरून दिसून येते.

leave a reply