युएईच्या जहाजावरील कारवाई म्हणजे इस्रायलसाठी इशारा

- येमेनमधील हौथी बंडखोरांची धमकी

इस्रायलसाठी इशारातेहरान – काही दिवसांपूर्वी रेड सीच्या क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या युएईच्या जहाजावर केलेली कारवाई हा इस्रायलसाठी इशारा असल्याची धमकी येमेनमधील हौथी बंडखोरांनी दिली. येमेनच्या सागरी क्षेत्रातील इस्रायलच्या कारवाया खपवून घेणार नसल्याचे हौथी बंडखोरांनी धमकावले. गेल्या पाच वर्षांपासून येमेनमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे रेड सीच्या क्षेत्रातील व्यापारी जहाजांच्या सुरक्षेवर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. अशा परिस्थितीत, हौथी बंडखोरांनी युएईच्या जहाजावर केलेली कारवाई आणि इस्रायलला दिलेला इशारा, या क्षेत्रातील तणाव अधिकच वाढवित आहे.

चार दिवसांपूर्वी युएईचे मालवाहू जहाज सौदी अरेबियाच्या पश्‍चिमेकडील जझान बंदरासाठी निघाले होते. रेड सीच्या क्षेत्रात या जहाजाने प्रवेश करताच हौथी बंडखोरांनी या जहाजाचे अपहरण केले. येमेनच्या हौदेदा बंदरात उभ्या केलेल्या या जहाजात लष्करी वाहने व इतर शस्त्रसाठा असल्याचा दावा हौथी बंडखोरांनी केला आहे. आपल्या विरोधात सौदी अरेबियाला शस्त्रसज्ज करण्यासाठी युएईने हा साठा रवाना केल्याचा ठपका हौथी बंडखोरांनी ठेवला.

ही कारवाई करताना हौथी जवानांनी मोठा पराक्रम दाखविल्याचा दावा हौथी बंडखोर संघटनेचा उपप्रवक्ता कर्नल अझिझ राशिद याने केला. कुठल्याही लष्करी प्रतिकाराशिवाय आपल्या जवानांनी युएईच्या जहाजाचा ताबा घेतल्याचे हौथी बंडखोरांच्या उपप्रवक्त्याने सांगितले. त्याचबरोबर युएईच्या जहाजावरील ही कारवाई इस्रायलसाठी इशारा असल्याचे कर्नल राशिद याने धमकावले. ‘यानंतरही इस्रायलने आमच्याविरोधात कारवाई केली तर इस्रायली नौदलाची जहाजे आणि लष्करी तळ उद्ध्वस्त केले जातील. त्याचबरोबर येमेनच्या बेटावरील इस्रायलचे अस्तित्व फार काळ टिकणार नाही`, अशी धमकी राशिदने दिली. तसेच वर्षाच्या सुरुवातीला केलेली ही एकमेव कारवाई नसून यापुढेही अशा कारवाया केल्या जातील, याची घोषणा हौथी बंडखोरांच्या उपप्रवक्त्याने केली. गेल्या पाच वर्षांपासून येमेनमधील राष्ट्राध्यक्ष हादी यांच्या सरकारविरोधात संघर्ष छेडणाऱ्या हौथी बंडखोरांना इराणचे समर्थन आहे. त्यामुळे हौथींनी इस्रायलला दिलेल्या या इशाऱ्याचे गांभीर्य वाढले आहे.

इस्रायलसाठी इशाराकर्नल राशिद यांनी या धमकीद्वारे येमेनच्या दक्षिणेकडील सोकोट्रा बेटावर इस्रायलच्या कथित लष्करी तळाकडे लक्ष वेधल्याचा दावा केला जातो. एडनच्या आखातातील सोकोट्रा बेट येमेनच्या सागरी क्षेत्रात असून येथील काही भागावर युएईचा ताबा असल्याचे बोलले जाते. तसेच युएईच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागावर इस्रायलच्या लष्कराने तळ विकसित करीत असल्याच्या बातम्या याआधी आल्या होत्या. हिंदी महासागर ते रेड सीच्या क्षेत्रातील इराणच्या जहाजांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी या तळाचा वापर करणार असल्याचा दावा इराणच्या माध्यमांनी केला होता. इस्रायलच्या लष्कराने सदर बातमीवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. हौथी बंडखोरांनी दिलेल्या नव्या इशाऱ्यावरही इस्रायलने प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, याआधीही हौथी बंडखोरांनी इस्रायलच्या दक्षिणेकडील भागावर क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविण्याचा इशारा दिला होता. पण यावेळी हौथी बंडखोरांनी रेड सीच्या क्षेत्रात इस्रायली जहाजांवर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. युरोपिय देशांना आखाती व आशियाई देशांशी जोडणाऱ्या रेड सीच्या क्षेत्रातून इस्रायली नौदल तसेच प्रवासी व मालवाहू जहाजांची वर्दळ सुरू असते. पुढच्या काळात हौथी बंडखोरांनी इथून प्रवास करणाऱ्या जहाजांवर कारवाई केली तर त्याचे फार मोठे पडसाद उमटू शकतात. त्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीवर होईल, याकडे इस्रायली विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत.

leave a reply