उत्तर कोरिया कधीही, कुठेही लहान अणुबॉम्बचा वापर करण्यासाठी तयार

- उत्तर कोरियाच्या हुकूमशहांची धमकी

सेऊल – उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांनी अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानला नवी धमकी दिली. उत्तर कोरियाचे लष्कर आपल्या शत्रूविरोधात कधीही, कुठेही छोट्या व नव्या अणुबॉम्बचा वापर करण्यासाठी तयार आहे, असे किम जाँग यांनी धमकावले. अमेरिकेची अजस्त्र विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस निमित्झ’ दक्षिण कोरियाच्या बुसान बंदरात दाखल झालेली असताना उत्तर कोरियाने ही घोषणा केली.

उत्तर कोरिया कधीही, कुठेही लहान अणुबॉम्बचा वापर करण्यासाठी तयार - उत्तर कोरियाच्या हुकूमशहांची धमकीउत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने हुकूमशहा किम जाँग-उन यांचा व्हिडिओ मंगळवारी प्रसिद्ध केला. यामध्ये किम जाँग लष्कराने विकसित केलेल्या क्षेपणास्त्रांची पाहणी करताना दिसत आहेत.

दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणुबॉम्बच्या आकाराचे छोटे क्षेपणास्त्र देखील यात दिसत आहे. ही पाहणी झाल्यानंतर उत्तर कोरियाच्या हुकूमशहांनी छोट्या अणुबॉम्बच्या वापराची धमकी दिली.

अणुऊर्जा आयोगाच्या जुन्या अहवालानुसार, उत्तर कोरियाकडे 80 ते 90 अणुबॉम्ब आहेत. तरीही 100 ते 300 अणुबॉम्बचा साठा करण्यासाठी किम जाँग यांचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे हुकूमशहा किम जाँग यांची धमकी अतिशय गंभीर ठरते.

काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि पाणबुडीतून प्रक्षेपित केले जाणारे टॉर्पेडोज्‌‍ आण्विक स्फोटकांनी सज्ज करण्याचा इशारा दिला होता.

हिंदी

 

leave a reply