अमेरिका-दक्षिण कोरियातील युद्धसरावानंतर उत्तर कोरियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी

सेऊल – उत्तर कोरियाच्या लष्कराने शुक्रवारी लघू पल्ल्याची दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्करामध्ये उत्तर कोरियाला लक्ष्य करणारा युद्धसराव पार पडला. यामुळे खवळलेल्या उत्तर कोरियाने ही क्षेपणास्त्र चाचणी घेतल्याचा दावा केला जातो. या वर्षात उत्तर कोरियाने जपान व दक्षिण कोरियाच्या हद्दीजवळ एकूण ८० क्षेपणास्त्रे डागली आहेत. अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा हवाई सराव सुरू झाला आहे. मंगळवारपासून या सरावाची सुरुवात झाली असून गुरुवारी खराब वातावरणामुळे हा सराव रद्द करण्यात आला होता. या सरावात अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अमेरिकेच्या बॉम्बर तसेच स्टेल्थ श्रेणीतील लढाऊ विमानांनी सहभाग घेतला होता. येत्या काळात उत्तर कोरियाने हल्ला चढविलाच तर त्याला कसे उत्तर द्यायचे. तसेच उत्तर कोरियाच्या कोणत्या ठिकाणांना लक्ष्य करायचे, यावर हा सराव आधारलेला होता.

korea missileया सरावातून दक्षिण कोरियाने आपली हवाई टेहळणी यंत्रणा अधिक मजबूत झाल्याचे दाखवून दिले. अमेरिकेबरोबरच्या लष्करी सहकार्याचा भाग म्हणून हा सराव पार पडल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. पण हा सराव आपल्याविरोधात आणि आपल्याला लक्ष्य करून असल्याचा संताप उत्तर कोरियाने व्यक्त केला. यानंतर शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास उत्तर कोरियाने लघू पल्ल्याची दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली.

उत्तर कोरियाच्या सूनान किनारपट्टीपासून ‘ईस्ट सी’मधील २५० ते ३५० किलोमीटर अंतरावरील कोरिया तसेच जपानच्या सागरी क्षेत्रात ही क्षेपणास्त्रे कोसळली. यापैकी एका क्षेपणास्त्राच्या ट्रॅजेक्ट्रीमध्ये काही बदल जाणवल्याचे जपानचे उपसंरक्षणमंत्री तोशिरो इनो यांनी म्हटले आहे. तसेच उत्तर कोरियाने या चाचणीसाठी केएन-२३ हे आण्विक स्फोटके वाहून नेणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याची शक्यता इनो यांनी वर्तविली. रशियाकडील इस्कंदर क्षेपणास्त्राची नक्कल मारून उत्तर कोरियाने केएन-२३ क्षेपणास्त्र विकसित केले आहे. याची आठवण करून देत जपानच्या उपसंरक्षणमंत्र्यांनी उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले. दरम्यान, उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्या जपानच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असल्याचा आरोप जपानने याआधी केला होता.

leave a reply