भारत-बांगलादेश मुक्त व्यापारी करारावर वाटाघाटी सुरू करणार

नवी दिल्ली – भारत व बांगलादेशमध्ये मुक्त व्यापारी करारावर दोन्ही देशांच्या व्यापारमंत्र्यांची चर्चा पार पडली. लवकरच यावर दोन्ही देशांच्या वाटाघाटी सुरू होतील. याबरोबरच उभय देशांचा व्यापार भारताच्या रुपयामध्ये करण्यावरही व्यापारमंत्री पियूष गोयल व बांगलादेशचे व्यापारमंत्री टिपू मुन्शी यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी श्रीलंका आणि रशियामधील व्यापारात भारताच्या रुपयाचा वापर करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाल्याच्याही बातम्या येत आहेत. त्यामुळे रुपयाच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारात वाढ होणार असून आंतरराष्ट्रीय चलन म्हणून रुपयाचे महत्त्व वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Free Trade Agreementभारत व बांगलादेशमधील द्विपक्षीय व्यापार २०२१-२२च्या वित्तीय वर्षात १८ अब्ज डॉलर्सवर गेला. आधीच्या वित्तीय वर्षाच्या तुलनेत यात तब्बल आठ अब्ज डॉलर्सची वाढ झालेली आहे. दोन्ही देशांमधील मुक्त व्यापारी कराराची व्यवहार्यता तपासून पाहणारा अहवाल (कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट-सीईपीए) नुकताच प्रसिद्ध झाला. यात दोन्ही देशांना मुक्त व्यापारी कराराचा फार मोठा लाभ मिळेल, असा निष्कर्ष नोंदविण्यात आल्याची माहिती भारताच्या व्यापार मंत्रालयाने दिली. या मुक्त व्यापारी करारामुळे दोन्ही देशांची उत्पादने विनाअडथळा एकमेकांच्या देशात उपलब्ध होऊ शकतात. तसेच यामुळे दोन्ही देशांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढ शकतो, असा दावा व्यापार मंत्रालयाने केला होता.

या पार्श्वभूमीवर, भारत व बांगलादेशच्या व्यापारमंत्र्यांचे मुक्त व्यापारी करारावरील वाटाघाटी सुरू करण्यावर एकमत झाले. याचा फार मोठा लाभ द्विपक्षीय व्यापाराला मिळेल. याबरोबरच व्यापारासाठी भारताच्या रुपयाचा वापर करण्यावरही दोन्ही देशांच्या व्यापारमंत्र्यांची चर्चा झाल्याचे वृत्त आहे. याचा फार मोठा लाभ भारत व बांगलादेशालाही मिळू शकतो. कोरोनाची साथ व त्यानंतर पेटलेल्या युक्रेनच्या युद्धाचा परिणाम बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. अशा परिस्थितीत आपल्या गंगाजळीतील डॉलर्स खर्च न करता भारताच्या रुपयामध्ये व्यवहार करण्याची सवलत बांगलादेशला मिळाली, तर या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ही उपकारक बाब ठरेल.

युक्रेनच्या युद्धानंतर रशियाला धडा शिकविण्यासाठी अमेरिकेने डॉलरचा हत्यारासारखा वापर करण्याचे सत्र सुरू केले होते. त्यापासून धडा घेऊन रशियासह चीन व इतर देशांनीही आपले डॉलरवरील अवलंबित्त्व कमी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. रशिया व चीनसारख्या देशांबरोबर आपल्या देशांच्या चलनांमध्ये व्यवहार करण्यासाठी काही देशांनी पुढाकार घेतला असून भारताच्या रुपयाचेही महत्त्वही वाढत चालले आहे. भारत व रशियाने रुपया-रूबलमध्ये व्यवहार करण्यासाठी पावले उचलल्यानंतर, इतर काही देशांनी यासाठी पुढाकार घेतल्याचे समोर येत आहे. बांगलादेशाने याची तयारी दाखविल्याचे व्यापारमंत्री टिपू मुन्शी यांच्या भारतभेटीत स्पष्ट झाले आहे.

यासंदर्भात बातम्या येत असतानाच, श्रीलंकेने देखील रशियाबरोबरील व्यापारासाठी भारताच्या रुपयात व्यवहार करण्याची तयारी केली आहे. यावर रशिया आणि श्रीलंकेमध्ये एकमत झाल्याचे सांगितले जाते. यासाठी अद्याप रिझर्व्ह बँकेकडून मान्यता मिळालेली नाही. पण लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होऊन रशिया व श्रीलंकेमधील व्यवहारासाठी रुपयाचा वापर केला जाण्याची दाट शक्यता आहे. भारताने पाकिस्तानचा अपवाद वगळता आपल्या इतर शेजारी देशांबरोबरील व्यापारासाठी डॉलरऐवजी रुपयाचा वापर केला तर त्यामुळे वर्षाकाठी भारताचे ३५ ते ४० अब्ज डॉलर्स वाचतील, असा दावा करण्यात येतो. याची तयारी भारताने केली असून इतर देश देखील भारताला प्रतिसाद देत असल्याचे दिसू लागले आहे.

leave a reply