अफगाणिस्तान प्रकरणी रशिया, चीन, इराण व पाकिस्तानची विशेष बैठक

सुरक्षेच्या मुद्यावर चर्चा

समरकंद – अफगाणिस्तानातील स्थैर्य आणि दहशतवादी संघटनांचे हल्ले यावर चर्चा करण्यासाठी उझबेकिस्तानची राजधानी समरकंदमध्ये विशेष बैठक पार पडली. यामध्ये रशिया, चीन, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तर पाकिस्तानच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी सहभाग घेतला होता. अफगाणिस्तानात राजकीय स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी आणि मानवतावादी संकट टाळण्यासाठी पुढाकार घेण्याचे जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर अफगाणिस्तानचा वापर भू-राजकीय शत्रूत्वासाठी केला जाऊ नये, अशी भूमिका रशियाने यावेळी घेतली.

iran russia china pak meetगुरुवारी समरकंद येथे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅवरोव्ह, चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग, इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन आमीर-अब्दोल्लाहियान आणि पाकिस्तानच्या उपपरराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांच्यात बैठक पार पडली. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर या चार देशांमधील ही दुसरी बैठक ठरते. या बैठकीच्या निमित्ताने रशियाने अफगाणिस्तानातील स्थैर्य व सुरक्षेचा मुद्दा मांडला. तसेच अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकार स्थापन व्हावे, अशी मागणीही रशियाने केली.

२०२१ सालच्या ऑगस्ट महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेऊन या देशात आपली राजवट प्रस्थापित केली. त्याबरोबर बहुतांश देशांनी अफगाणिस्तानातील आपले दूतावास बंद करून माघार घेतली होती. पण तालिबानने या देशावर ताबा मिळविल्यानंतरही अफगाणिस्तानात दूतावास सुरू ठेवणाऱ्या काही मोजक्या देशांमध्ये रशिया तसेच चीनचा समावेश होता. यामागे वेगवेगळी कारणे होती.

अफगाणिस्तानची सीमारेषा माजी सोव्हिएत देशांना भिडलेली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील दहशतवाद या शेजारी देशांमध्ये पसरला तर तो आपल्या देशातही पसरण्यास फार काळ लागणार नाही, याची रशियाला जाणीव होती. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानातील दूतावास सुरू ठेवून रशियाने तालिबानशी जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. तर अमेरिकेच्या माघारीबरोबर अफगाणिस्तानवर आपला प्रभाव वाढवून येथील अब्जावधी डॉलर्सच्या खनिजसंपत्तीचे उत्खनन करण्याची तयारी चीनने केली होती. त्यामुळे अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर चीनने या देशातील आपला दूतावास सुरू ठेवला. त्याचबरोबर येथील खनिजसंपत्तीच्या उत्खननाबाबत चीनने तालिबानशी वेगवेगळे करार केले. यासाठी चीनने अफगाणिस्तानात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे.

रशिया-चीनप्रमाणे पाकिस्तानने अफगाणिस्तानातील दूतावास सुरू ठेवले होते. तसेच अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर पाकिस्तानने जल्लोषही केला होता. गेली काही वर्षे आपल्या नियंत्रणाखाली असणाऱ्या तालिबानला हाताशी धरून अफगाणिस्तानला टाचेखाली आणण्याची स्वप्ने पाकिस्तानने पाहिली होती. पण गेल्या दीड वर्षात पाकिस्तानची स्वप्ने हवेतच विरून गेली आहेत.

leave a reply