उत्तर कोरियाकडून क्रूझ्‌‍ क्षेपणास्त्रांची चाचणी

- दक्षिण कोरियाच्या लष्कराची माहिती

सेऊल – बुधवारी सकाळी उत्तर कोरियाने क्रूझ्‌‍ क्षेपणास्त्रांची एकत्र चाचणी केली. पूर्वेकडील किनारपट्टीवरुन प्रक्षेपित करण्यात आलेली ही क्षेपणास्त्रे जवळच्या सागरी क्षेत्रात कोसळली. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांनी या चाचणीची पाहणी केल्याचा दावा केला जातो. येत्या काही तासात अमेरिका व दक्षिण कोरियातील लष्करी सराव संपन्न होणार आहे. त्याआधी उत्तर कोरियाने ही चाचणी करून इथला तणाव वाढविला आहे.

उत्तर कोरियाकडून क्रूझ्‌‍ क्षेपणास्त्रांची चाचणी - दक्षिण कोरियाच्या लष्कराची माहितीगेल्या दोन वर्षांपासून उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्यांचा सपाटा लावला आहे. उत्तर कोरियाने लघू तसेच मध्यम पल्ल्याबरोबरच लांब पल्ल्याच्या तसेच बॅलेस्टिक आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची देखील चाचणी घेतली आहे. त्याचबरोबर आण्विक स्फोटके वाहून नेणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याची धमकीही उत्तर कोरियाने दिली होती.

गेल्याच आठवड्यात उत्तर कोरियाच्या राजवटीने अमेरिका, दक्षिण कोरियाला अणुहल्ल्याचा इशारा दिला होता. यामुळे पूर्व आशियातील तणावात भर पडली आहे.

पण उत्तर कोरियाने आपल्या या क्षेपणास्त्र चाचण्यांसाठी अमेरिका व दक्षिण कोरियाला जबाबदार धरले. या दोन्ही देशांचे युद्धसराव म्हणजे आपल्या देशावरील हल्ल्याची रंगीत तालिम असल्याचा आरोप उत्तर कोरियाने केला होता. गेल्या आठवड्यात अमेरिका व दक्षिण कोरियाच्या लष्करात सुरू झालेला ‘फ्रिडम शिल्ड 23’ हा सराव देखील आपल्या देशात लष्कर घुसविण्याची तयारी असल्याचा दावा उत्तर कोरिया करीत आहे.

या पार्श्वभूमीवर, सदर सरावाला उत्तर देण्यासाठी उत्तर कोरियाने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. बुधवारी सकाळी क्रूझ्‌‍ क्षेपणास्त्रांची एकत्र केलेली चाचणी देखील उत्तर कोरियाकडून अमेरिका व दक्षिण कोरियाला दिलेला इशारा असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, अमेरिका-दक्षिण कोरियातील फ्रिडम शिल्ड युद्धसराव गुरुवारी संपुष्टात येणार आहे. यानंतर जून महिन्यात आणखी एका मोठ्या युद्धसरावाचे आयोजन केले जाईल, अशी घोषणा दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने केली. या युद्धसरावात लाईव्ह फायर वापरले जाणार असून यावर देखील उत्तर कोरियाकडून जहाल प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

हिंदी

 

leave a reply