बँकिंग क्षेत्रातील समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास अमेरिकेतील 50 बँका दिवाळखोरीत जातील

- लेहमन ब्रदर्सच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इशारा

वॉशिंग्टन – अमेरिकी यंत्रणांनी बँकिंग क्षेत्रातील समस्यांकडे दुर्लक्ष करून सुधारण न घडविल्यास देशातील किमान 50 बँका दिवाळखोरीत जाऊ शकतात, असा इशारा लेहमन ब्रदर्सच्या माजी अधिकाऱ्यांनी दिला. 2008 साली अमेरिकेतील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असणारी लेहमन ब्रदर्स कोसळली होती. त्यानंतर साऱ्या जगावर आर्थिक मंदीचे संकट कोसळले होते. लेहमन ब्रदर्सचे माजी अधिकारी असणाऱ्या लॉरेन्स मॅक्‌‍डोनाल्ड यांनी बँकिंग क्षेत्रातील नवे संकट त्याहून अधिक गंभीर असल्याचे बजावले आहे.

बँकिंग क्षेत्रातील समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास अमेरिकेतील 50 बँका दिवाळखोरीत जातील - लेहमन ब्रदर्सच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इशाराअमेरिकेतील तीन बँका अवघ्या एका आठवड्याच्या आत दिवाळखोरीत गेल्या आहेत. यातील ‘एसव्हीबी’चे अपयश अमेरिकेच्या इतिहासातील 2008 सालानंतरचे सर्वात मोठे अपयश म्हणून ओळखण्यात येते. यासह ‘सिल्व्हरगेट’ व ‘सिग्नेचर बँक’ या दोन्ही बँका कोसळल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद अमेरिकेतील बॅकिंग क्षेत्रात उमटले आहेत. अमेरिकेतील ‘फर्स्ट रिपब्लिक’ या बँकेलाही धक्के बसले असून इतर बँकांकडून निधी उपलब्ध झाल्यानंतरही बँकेची स्थिती सावरलेली नाही. या बँकेतून खातेदार व समभागधारकांनी 80 अब्ज डॉलर्सहून अधिक रक्कम काढून घेतल्याचे सांगण्यात येते.

अमेरिकेतील या ‘बँकिंग क्रायसिस’चे परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावरही दिसून आले. जगभरात बँकिंग क्षेत्राच्या समभागांची जबरदस्त पडझड झाली असून ही पुढे येणाऱ्या मोठ्या संकटाची सुरुवात असल्याचे दावे करण्यात येत आहेत. बँकिंग क्षेत्रातील समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास अमेरिकेतील 50 बँका दिवाळखोरीत जातील - लेहमन ब्रदर्सच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इशारालेहमन ब्रदर्सच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेला दावाही त्याला दुजोरा देणारा ठरतो. ‘2008 साली लेहमन ब्रदर्स अपयशी ठरल्यानंतर वित्त क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांना फटका बसला होता. आता व्याजदरातील वाढीमुळे अमेरिकेतील प्रादेशिक बँकांना धक्के बसत आहेत. या बँकांमधील अब्जावधी डॉलर्स बड्या बँकांकडे जात आहेत. यात बदल झाला नाही तर अमेरिकेतील अजून 50 बँका दिवाळखोरीत जाऊ शकतात’, असे लॉरेन्स मॅक्‌‍डोनाल्ड यांनी बजावले.

यावेळी त्यांनी फेडरल रिझर्व्हच्या धोरणांवरही ताशेरे ओढले. फेडरल रिझर्व्ह व त्याच्या प्रमुखांना बँकांना असलेल्या धोक्याची अजिबात जाणीव नव्हती, असा आरोप मॅक्‌‍डोनाल्ड यांनी केला. फेडरल रिझर्व्हने व्याजदरातील वाढ मागे घेणे आवश्यक असल्याची मागणी मॅक्‌‍डोनाल्ड यांनी केली. त्याचवेळी बँकांमध्ये ठेवलेल्या निधीला असणारी सुरक्षेची मर्यादाही वाढवायला हवी, असेही त्यांनी म्हटले आहे. बँकिंग क्षेत्रातील समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास अमेरिकेतील 50 बँका दिवाळखोरीत जातील - लेहमन ब्रदर्सच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इशाराबँकेतील निधीची संपूर्ण हमी अमेरिकी प्रशासनाने घ्यायला हवी व बेलआऊट द्यायला हवा, या शब्दात लेहमन ब्रदर्सच्या माजी अधिकाऱ्यांनी आवश्यक सुधारणांची जाणीव करून दिली.

काही दिवसांपूर्वी अमेरिकी अर्थतज्ज्ञांनी जाहीर केलेल्या एका अहवालात देशातील बँकिंग क्षेत्राला असणाऱ्या धोक्यांकडे लक्ष वेधले होते. अमेरिकेतील 200 बँका संकटाच्या उंबरठ्यावर असून खातेदार व इतर ग्राहकांचे तब्बल 300 अब्ज डॉलर्सचे नुकसान होऊ शकते असा इशारा सदर अहवालात देण्यात आला होता. दरम्यान, अमेरिकेच्या अर्थमंत्री जॅनेट येलेन यांनी, अमेरिकेतील छोट्या बँकांसमोर असलेल्या आर्थिक संकटाची कबुली देताना आवश्यकता भासल्यास इतर बँकांनाही अर्थसहाय्य पुरविले जाईल, असे वक्तव्य केले आहे.

हिंदी

 

leave a reply