उत्तर कोरियाने किरणोत्सर्गी त्सुनामी निर्माण करणाऱ्या ड्रोनची चाचणी घेतली

- उत्तर कोरियन वृत्तसंस्थेची माहिती

सेऊल – थेट अमेरिकेच्या अतिपूर्वेकडील शहरांपर्यंत मारा करू शकणारी दीर्घ पल्ल्याची आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे असल्याचा दावा करणाऱ्या उत्तर कोरियाने शुक्रवारी नवी घोषणा केली. अमेरिका व शत्रू देशांच्या किनारपट्टीला किरणोत्सर्गी त्सुनामीची धडक देण्याची तयारी आपण केल्याची घोषणा उत्तर कोरियन वृत्तसंस्थेने दिली. हुकूमशहा किम जाँग-उन यांच्या उपस्थितीत पाण्याखालून प्रक्षेपित केलेल्या ड्रोनची चाचणी घेतल्याची माहिती या वृत्तसंस्थेने दिली. आण्विक स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या ड्रोनमुळे शत्रू देशाच्या किनारपट्टीला किरणोत्सर्गी त्सुनामीचा तडाखा बसू शकतो, असा इशारा उत्तर कोरियाने दिला.

उत्तर कोरियाने किरणोत्सर्गी त्सुनामी निर्माण करणाऱ्या ड्रोनची चाचणी घेतली - उत्तर कोरियन वृत्तसंस्थेची माहितीअमेरिका व दक्षिण कोरियाच्या लष्करातील 11 दिवसांचा ‘फ्रिडम शिल्ड’ युद्धसराव गुरुवारी संपन्न झाला. त्याचबरोबर या दोन्ही देशांनी जून महिन्यातील ‘लाईव्ह फायर’ युद्धसरावाचीही माहिती जाहीर केली. याला चोवीस तासही उलटत नाही तोच उत्तर कोरियाच्या ‘कोरियन सेंल न्यूज एजन्सी’ने नव्या चाचणीची घोषणा केली. उत्तर कोरियाच्या लष्कराने ‘हाईल’ या पाण्याखालून प्रवास करणाऱ्या ड्रोनची चाचणी घेतली. शत्रूच्या रडारला गुंगारा देण्यात सक्षम असलेला हा आपला ड्रोन आण्विक स्फोटके वाहून नेऊ शकतो. यामुळे शत्रूच्या किनारपट्टीजवळ पोहोचताच प्रचंड मोठ्या आकाराची किरणोत्सर्गी त्सुनामी तयार होते, असा दावा उत्तर कोरियन वृत्तसंस्थेने केला.

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांनी हाईल ड्रोनच्या 29 चाचण्यांची पाहणी केली. गुरुवारी या ड्रोनची शेवटची चाचणी पार पडली. हॅमहंग आणि सिंफो या दोन किनारपट्टीच्या शहरांदरम्यान ही चाचणी घेण्यात आली. तर हाँगवोन बे बंदराजवळ या ड्रोनचा स्फोट घडविण्यात आल्याचे, उत्तर कोरियन वृत्तसंस्थेने म्हटले आहे. 2012 सालापासून यावर छुप्यारितीने काम सुरू होते व गेल्या डिसेंबर महिन्यातच सदर ड्रोन लष्करात सामील करून घेण्याचा निर्णय झाला, अशी माहिती उत्तर कोरियन वृत्तसंस्थेने दिली. याशिवाय उत्तर कोरियाने सदर ड्रोन्सचे तपशील जाहीर केलेले नाही. पण आपल्या आण्विक स्फोटकांचा वेगवेगळ्या रितीने वापर करण्यावर उत्तर कोरिया काम करीत असल्याचे गंभीर संकेत यातून मिळत असल्याचे पाश्चिमात्य विश्लेषकांनी म्हटले आहे.

दरम्यान, प्रक्षोभक क्षेपणास्त्र चाचण्या घेऊन या क्षेत्रात तणाव निर्माण करणऱ्या उत्तर कोरियाला धडा शिकविणार असल्याचा इशारा दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्ष युन सूक येओल यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्याचबरोबर दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिका व जपानबरोबर लष्करी सहकार्य वाढविण्यासाठी पावले टाकली आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाला धमकावण्यासाठी उत्तर कोरियाने ही चाचणी घेतल्याचा दावा दक्षिण कोरियन माध्यमे करीत आहेत. तर उत्तर कोरियाचा हाईल ड्रोन आणि रशियाचे पोसायडन ड्रोन एकसारखेच असल्याचा दावा ब्रिटिश माध्यमे करीत आहेत.

हिंदी English

 

leave a reply