उत्तर कोरियाची अमेरिका, दक्षिण कोरियावर अणुहल्ल्याची धमकी

kim-jong-unसेऊल – अमेरिका आणि दक्षिण कोरियाने येत्या काळात उत्तर कोरियाच्या विरोधात लष्करी संघर्ष छेडला तर या दोन्ही देशांवर अण्वस्त्रांचा वापर केला जाईल, अशी धमकी उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांनी दिली. तसेच या क्षेत्रातील अमेरिकेच्या लष्करी हालचाली व सहकार्य, दोन्ही कोरियन देशांना अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर आणत असल्याचा आरोप उत्तर कोरियाच्या राष्ट्रप्रमुखांनी केला. अमेरिका व दक्षिण कोरियाने अण्वस्त्रसज्ज उत्तर कोरियाची ही धमकी अतिशय गांभीर्याने घेतली आहे.

1950-53 या काळात दोन्ही कोरियन देशांमध्ये लढल्या गेलेल्या युद्धाला नुकतीच 69 वर्षे पूर्ण झाली. यानंतरच कोरियाचे विभाजन होऊन उत्तर आणि दक्षिण कोरिया, असे दोन देश निर्माण झाले. या निमित्ताने उत्तर कोरियामध्ये आयोजित केलेल्या लष्करी कार्यक्रमावेळी किम जाँग उन यांनी जाहीररित्या अमेरिका व दक्षिण कोरियाच्या विरोधात अण्वस्त्रांची तैनाती केली जाईल, असे स्पष्ट केले. यासाठी उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने अमेरिका व दक्षिण कोरियावर ताशेरे ओढले. तसेच आपल्या लष्करी सज्जतेची उजळणी केली.

korea-nuke‘उत्तर कोरियाचे लष्कर कुठल्याही संकटाला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. तर देशाची अण्वस्त्रे देखील प्रत्युत्तरासाठी, आपली मोहीम पूर्ण करण्यासाठी तयार आहेत’, असे हुकूमशहा किम जाँग उन म्हणाले. अमेरिका व दक्षिण कोरियाचे लष्करी सराव उत्तर कोरियाला लक्ष्य करणारे असल्याचा ठपका उन यांनी ठेवला. पण हे दोन्ही देश स्वत:च्या चुकांवर पडदा टाकण्यासाठी उत्तर कोरियाला खलनायक म्हणून रेखाटत असल्याचा आरोप हुकूमशहा उन यांनी जाहीर केले.

अमेरिका नेहमीच दुटप्पी धोरण स्वीकारते तर दक्षिण कोरियातील राष्ट्राध्यक्ष युन सूक येओल यांनी सूत्रे हातात घेतल्यापासून दक्षिण कोरिया एखाद्या गुंडासारखा वागत असल्याचा आरोप उन यांनी केला. येओल यांच्यापेक्षा दक्षिण कोरियाचे आधीचे राष्ट्राध्यक्ष चांगले होते, अशी तारीफही उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने केली.

गेल्या सात महिन्यांपासून उत्तर कोरियाने आपल्या क्षेपणास्त्रांच्या चाचणीने कोरियन क्षेत्रात तणाव वाढविला आहे. तर येत्या काही दिवसात उत्तर कोरिया अणुचाचणी घेणार असल्याचा दावा केला जातो. उत्तर कोरियाने याची पूर्ण तयारी केल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियामध्ये कोरोनाने थैमान घातल्यामुळे ही चाचणी पुढे ढकलली गेल्याचाही दावा केला जातो.

leave a reply