इस्रायल इराणच्या अणुकार्यक्रमाची जबरदस्त हानी घडवून आणू शकतो

-इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा

जेरूसलेम – इराण ही फक्त इस्रायलची खाजगी समस्या नाही, तर जगाची समस्या आहे. इराणच्या अणुकार्यक्रमाला गंभीर नुकसान पोहोचविण्याची क्षमता इस्रायलकडे आहे, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी दिला. तर 2015 सालचा अणुकरार पुनर्जिवित केल्यास इराणचा अणुकार्यक्रम फक्त धीमा होईल, असे सांगून गांत्झ यांनी बायडेन प्रशासनाच्या दाव्यांची हवा काढून घेतली.

Iran's nuclear programव्हिएन्ना व नंतर दोहा येथील वाटाघाटी अपयशी ठरल्यानंतरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन इराणच्या अणुकराराचा तिढा वाटाघाटीने सोडविण्यावर ठाम आहे. आठवड्यापूर्वी इस्रायलच्या भेटीवर असताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी याची घोषणा केली होती. याबाबत स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना, इस्रायलचे संरक्षणमंत्री गांत्झ यांनी या अणुकराराशी इस्रायल असमाधानी असल्याचे सांगितले. तसेच अणुकरारामुळे इराणचा अणुकार्यक्रम फक्त धीमा होईल, इराणला अणुबॉम्बच्या निर्मितीपासून रोखणार नसल्याचे गांत्झ यांनी स्पष्ट केले. इराणचा अणुकार्यक्रम धीमा करण्याची तसेच त्याला मोठे नुकसान पोहोचविण्याची क्षमता इस्रायलकडे असल्याचा इशारा गांत्झ यांनी दिला. इस्रायलने याआधीही इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ल्याचा इशारा दिला होता. इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख लेफ्टनंट जनरल कोशावी यांनी इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ल्यांसाठी सज्ज राहण्याची सूचना इस्रायली लष्कराला केली होती.

leave a reply